Join us  

स्वप्नांचं घर खरेदी करताना या 5 गोष्टींची घ्या काळजी!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2018 11:20 AM

स्वत:चं हक्काचं घर घेणं हे प्रत्येकाचच स्वप्न असतं. त्यासाठी सगळेच दिवसरात्र मेहनत करत असतात. पण आजकाल घर खरेदी करणं हे आधीसारखं सोपं राहिलेलं नाहीये.

स्वत:चं हक्काचं घर घेणं हे प्रत्येकाचच स्वप्न असतं. त्यासाठी सगळेच दिवसरात्र मेहनत करत असतात. पण आजकाल घर खरेदी करणं हे आधीसारखं सोपं राहिलेलं नाहीये. काही लोक आपल्या आयुष्याची कमाई घर घेण्यात खर्ची करतात. काही लोक लोन घेतात. जास्तीत जास्त लोक हे घर खरेदी करण्यासाठी बिल्डरच्या प्रतिष्ठेवर निर्भर असतात. पण ही धारणा चुकीची आहे. कारण घर घेण्याचे मापदंड हे घराची कागदपत्रे असायला हवीत. त्यामुळे घर खरेदी करताना खालील गोष्टींची काळजी घ्यायला हवी. 

बिल्डरने सगळे नियम पाळले आहेत का? त्याला सर्व परवानग्या मिळाल्या की नाही हेही बघायला हवं. त्यासोबतच वेगवेगळ्या फोरममध्ये जाऊन बिल्डरच्या विश्वसनियतेची पडताळणीही करायला हवी. त्या बिल्डरच्या याआधीच्या आणि पुढे होणाऱ्या प्रोजेक्टची माहिती घ्यायला हवी. 

1) जागेच्या मालकाची माहिती

ज्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही घर खरेदी करत आहात त्या जागेचा मालकी हक्क त्या बिल्डरकडे आहे की नाही हे तपासायला हवे. त्या बिल्डरला ती प्रॉपर्टी विकण्याचा किंवा त्या संपत्तीची मालकी ट्रान्सफर करण्याचा हक्क त्याला आहे का हे तपासावे. यावरुन हेही माहिती मिळेल की, या प्रॉपर्टीवर कोणती कायदेशीर कारवाई सुरु आहे की नाही. या सगळ्या माहितीला टायटल डीड म्हणतात. ही माहिती मिळवण्यासाठी एखाद्या वकिलाची मदत तुम्ही घेऊ शकता. 

2) विविध परवानग्या

यात वेगवेगळ्या 'नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट' समावेश होतो. बिल्डरला प्रॉपर्टी निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या परवानग्या प्रशासनाकडून घ्याव्या लागतात. त्यात पीडब्ल्यूडी, फॉरेस्ट, पर्यावरण विभाग, महापालिका यांच्या परवानग्यांचा समावेश असतो. त्यासोबतच बिल्डरला प्रोजेक्टचं काम करण्यासाठी मिळालेले कायदेशीर प्रमाणपत्रही तपासायला हवे. हे प्रमाणपत्र बिल्डरकडे नसल्यास ते काम बेकायदेशिर मानलं जातं.

3) कोणत्याही प्रकारची अडचण

कुणालाही अशा प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करायचं नसेल ज्यावर कायदेशीर कारवाई सुरु आहे. किंवा त्या जागेचं प्रकरण कोर्टात सुरु आहे. ब्रोकर, बिल्डर, एजन्ट अनेकदा ही माहिती लपवण्याचा प्रयत्न करतील. पण तुम्ही काळजीपूर्वक यासंबंधीचे प्रमाणपत्र बघायला हवे. कायद्याच्या कोणत्याही कचाट्यात प्रॉपर्टी असू नये हे निट तपासावे. 

4) लेआऊट प्लॅन

बाजार सगळीकडेच रिअल इस्टेट संबंधी घोटाळ्यांच्या बातम्या येत असतात. त्यामुळे घर खरेदी करताना ग्राहकांना काही गोष्टींची काळजी घ्यावी. सगळी कागदपत्रे तपासून बघायला हवी. अनेकदा प्रोजेक्टचा लेआऊट प्लॅन जो दाखवला जातो त्यापेक्षा वेगळं काहीतरी काम केलं जातं. असावेळी तुमची फसवणूक होऊ नये याची काळजी घ्या. 

5) ठरलेलं सगळं मिळालं का?

ग्राहकांनी सगळ्या प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर या गोष्टीची शहानिशा करावी की, बिल्डरने जी आश्वासने दिली होती ती पूर्ण केली आहेत का? कागदपत्रांमध्ये त्या सर्व आश्वासनांचा उल्लेख आहे का? हे तपासावे. तसे काही नसल्यास याचा जाब तुम्ही बिल्डरला विचारु शकता.  

टॅग्स :बांधकाम उद्योग