Join us

महाराष्ट्रातील उद्योगांसाठी कर्नाटकने अंथरले रेड कार्पेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2019 05:33 IST

सांगली जिल्ह्यातील उद्योजक सध्याअडचणींच्या चक्रव्यूहात अडकले आहेत.

अविनाश कोळी सांगली : सांगली जिल्ह्यातील उद्योजक सध्याअडचणींच्या चक्रव्यूहात अडकले आहेत. सुविधांचा अभाव, करांचे काटेरी कुंपण आणि मंदीच्या दाट छायेत त्यांची घुसमट होत आहे. महाराष्ट्र सरकारने त्यांच्या अडचणी सोडविण्याचा फार प्रयत्न न केल्याने, कर्नाटक सरकारने सीमावर्ती भागात त्यांच्यासाठी रेड कार्पेट अंथरले आहे. आता कर्नाटक सरकार त्यांना स्थलांतरासाठी आॅफर देत आहे.प्रतिकूल परिस्थितीतही येथील उद्योजक, व्यापाऱ्यांनी राज्यभर नावलौकिक मिळविला. औद्योगिक वसाहती, व्यापारी पेठांच्या स्थापनेनंतर प्रत्येक टप्प्यावर आलेल्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्नही केला. मात्र स्थानिक प्रशासन व राज्य सरकारच्या पातळीवर त्यांच्या पदरी निराशा आली. सांगली जिल्ह्यात गेल्या पन्नास वर्षांत एकही मोठा उद्योग येऊ शकला नाही. अन्य जिल्ह्यांमधील मोठ्या उद्योगधंद्यांशी संलग्नता बाळगत येथील छोट्या उद्योजकांनी येथे पाय रोवले. आजही येथील छोटे उद्योग अन्य जिल्ह्यांमधील परिस्थितीवर अवलंबून आहेत.गेल्या काही वर्षांपासून येथील उद्योग क्षेत्रात घुसमट आहे. उद्योजक, कामगार व या कारखान्यांवर अवलंबून असणारे छोटे घटक अडचणीत येत आहेत. कर्नाटक सीमेला लागून असलेल्या सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योजकांच्या या अडचणींवर कर्नाटक सरकार लक्ष ठेवून आहे. गेल्या दहा वर्षांत कर्नाटकच्या मंत्र्यांनी वारंवार बैठका घेऊन, येथील उद्योजक, व्यापाऱ्यांना स्थलांतरित होण्यासाठी वेगवेगळ्या आॅफर दिल्या. सांगली मार्केट यार्डातील सुमारे १0 टक्के व्यापारी यापूर्वी स्थलांतरीतही झाले आहेत. तरीही महाराष्टÑ सरकार याची दखलच घ्यायला तयार नाही.>त्याशिवाय जाग येणार नाहीमहाराष्टÑात आजपर्यंत अनेक पक्षांची सरकारे आली व गेली. मात्र कोणीही व्यापारी, उद्योजकांच्या प्रश्नांकडे लक्ष दिले नाही. त्यांच्याविषयी सरकारला, मंत्र्यांना, लोकप्रतिनिधींना आत्मियता नाही. मार्केट यार्डातील व्यापारी स्थलांतरित झाले तरीही, येथील लोकांना त्याचे काहीही वाटत नाही. अशीच स्थिती राहिली, तर व्यापारी, उद्योजक स्थलांतरित होतील. त्याशिवाय या लोकांना जाग येणार नाही.- समीर शहा, अध्यक्ष,व्यापारी एकता असोसिएशन, सांगली