Join us

जुलै ते सप्टेंबर! कंपन्या दणकून भरती काढणार; अर्थव्यवस्थेसाठी करावेच लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2022 13:48 IST

नोकऱ्यांच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. या काळात १२ टक्के कंपन्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी देखील करू शकतात.

नोकऱ्यांच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. गेल्या ८ वर्षांच्या तुलनेत यंदा अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. एका सर्व्हेमध्ये हा दावा करण्यात आला आहे. अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर टिकविण्यासाठी ६३ टक्क्यांहून अधिक कंपन्यांना जादा लोकांची गरज भासणार आहे. यामुळे कंपन्या वेगाने भरती काढतील. या काळात १२ टक्के कंपन्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी देखील करू शकतात. 

२४ टक्के कंपन्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होण्य़ाची शक्यता कमी आहे. म्हणजेच या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी देखील करणार नाहीत आणि नवीन भरती देखील करणार नाहीत. मॅनपावर ग्रुप एम्प्लॉयमेंट आउटलूक सर्व्हेनुसार तिसऱ्या तिमाहीमध्ये तिसऱ्या तिमाहीमध्ये शुद्ध रोजगारांतील बदल हा 51% अपेक्षित आहे, जो २०१४ पासून सर्वाधिक असणार आहे. 

डिजिटलच्या क्षेत्रात सर्वाधिक मागणी येणार आहे. आयटी आणि टेकमध्ये सर्वोत्तम दिवस आहेत. त्यापाठोपाठ बँकिंग, वित्त, विमा आणि रिअल इस्टेट 60 टक्के वाढ दिसत आहे. रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्सचा आउटलुक 48 टक्के, उत्पादन 48 टक्के आहे. डिजिटायझेशन, ऑटोमेशन आणि तंत्रज्ञानासह सेवांची गरज वाढत आहे. यामुळे जगभरातील भारतीय IT व्यावसायिकांची मागणी देखील वाढत आहे, ज्यामुळे IT आणि टेक भारतीय जॉब मार्केटमध्ये प्रथम क्रमांकावर आहे. 

सर्व्हे कंपनीचे एमडी संदीप गुलाटी यांनी सांगितले की, वाढती महागाई आणि जागतिक स्तरावरील वाढत असलेल्या अस्थिरतेनंतर देशात अनेक क्षेत्रांमध्ये रिकव्हरी प्रक्रिया वेगाने होत आहे. या सर्व्हेमध्ये ३ हजार कंपन्या सहभागी झाल्या होत्या. 

टॅग्स :नोकरी