Join us  

जून महिन्यात वाढले नोकऱ्यांचे प्रमाण; मुंबईत १२, तर पुण्यात ६ टक्क्यांनी झाली वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 9:23 AM

कोरोनाचे निर्बंध कमी होत असतानाच जून महिन्यात सर्वच क्षेत्रांमध्ये नोकऱ्यांचे प्रमाण चांगले वाढलेले दिसून आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क  

नवी दिल्ली : कोरोनाचे निर्बंध कमी होत असतानाच जून महिन्यात सर्वच क्षेत्रांमध्ये नोकऱ्यांचे प्रमाण चांगले वाढलेले दिसून आले आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासह उत्पादन व अन्य क्षेत्रांमध्येही नोकऱ्या वाढलेल्या आहेत. शहरांमध्ये झालेली वाढ विचारात घेता महाराष्ट्रामधील मुंबई शहरात १२, तर पुणे येथे सहा टक्क्यांनी नोकऱ्या वाढल्या आहेत. 

‘साईकी मार्केट पोर्टल’ या नोकरीविषयक वेबसाइटने विविध नोकऱ्यांबाबतचे प्रत्यक्ष अहवाल तपासून केलेल्या संशोधनामधून हे सार निघाले आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामधील नोकऱ्या मोठ्या गतीने वाढत आहेत, ही बाब अधोरेखित करतानाच जून महिन्यामध्ये अन्य क्षेत्रांमधील नोकऱ्यांमध्येही चांगली वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामध्ये उत्पादन आणि सेवाक्षेत्राचा समावेश आहे. 

मे महिन्याच्या तुलनेत जून महिन्यात बँकिंग क्षेत्रामधील नोकऱ्यांची वाढ २१ टक्क्यांची असून, २० टक्क्यांची वाढ नोंदविणारे आरोग्य क्षेत्र दुसऱ्या स्थानावर आहे. माहिती तंत्रज्ञान व बीपीओमधील वाढ प्रत्येकी १८ टक्के, औषध निर्मिती क्षेत्रामध्ये १६.९ टक्के, तर विमा क्षेत्रात १२ टक्के वाढ राहिली आहे. याशिवाय एफएमसीजी क्षेत्रामध्ये १६, शैक्षणिक क्षेत्रात १२.१, तर रिटेल क्षेत्रामधील नोकऱ्यांची वाढ ५ टक्के राहिली आहे. मात्र, या महिन्यातच दूरसंचार क्षेत्रामध्ये ८ टक्के नोकऱ्यांमध्ये घट झालेली असल्याचे या सर्वेक्षणातून पुढे आले आहे.

जयपूर, अहमदाबादमध्ये चांगली वाढ

जून महिन्यामध्ये नोकऱ्यांमधील वाढीत जयपूर आणि अहमदाबाद ही शहरे अत्युच्च आहेत. या शहरांमधील नोकऱ्या मिळण्यामध्ये अनुक्रमे ३० आणि २२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यापाठोपाठ कोलकात्याचा क्रमांक लागत असून, तेथील वाढ २० टक्के नोंदविली गेली आहे. मुंबई, चेन्नई आणि हैदराबाद प्रत्येकी १२ टक्के वाढ देणारी आहेत, तर पुण्यामध्ये सहा, तर दिल्लीमध्ये १ टक्क्याची वाढ नोंदविली गेली आहे.

टॅग्स :नोकरीमुंबईपुणेजयपूरअहमदाबादव्यवसायकेंद्र सरकार