Join us
Daily Top 2Weekly Top 5

टेक कंपन्यांमधील नोकर कपात थांबेना, एका महिन्यात २७ हजार जणांच्या नोकऱ्या गेल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 18:46 IST

गेल्या काही महिन्यांपासून देशातील टेक कंपन्यांमध्ये नोकर कपात सुरू आहे.

जगभरात टेक कंपन्यांमध्ये नोकर कपात सुरू आहे. ही कपात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असून अजुनही कपात करणे सुरूच आहे. आता ऑगस्ट महिन्यात नोकरी कपात करण्याबाबत नवीन रेकॉर्ड केले आहे. Apple, Intel, Cisco, IBM या मोठ्या कंपन्यांनी ऑगस्ट महिन्यात ४० टेक कंपन्यांमध्ये कॉस्ट कटिंगच्या नावाखाली २७,००० कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

युपीआय पेमेंट करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; बँकेत न जाताही जमा करता येणार पैसे

आतापर्यंत टेक कंपन्यांनी १,३६,००० जणांना कामावरून काढून टाकले आहे. जगभरातील टेक कंपन्यांची ही स्थिती चिंताजनक असून या क्षेत्रातील गोंधळामुळे कर्मचाऱ्यांच्या नोकरीच्या सुरक्षेशी संबंधित अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

AI मुळे Apple कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या

Appleने कंपनीतील शेकडो कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. कंपनीने सर्व्हीस विभागातील सुमारे १०० जणांना कामावरून काढून टाकले आहे. यामध्ये ॲपल बुक्स ॲप आणि ॲपल बुकस्टोअरचे कर्मचारी आणि काही अभियंते यांचा समावेश आहे. कंपनीच्या या कपातीमध्ये AI ने मोठी भूमिका असल्याचे बोलले जाते. कंपनी आता ॲपल बुक्स ॲप व्यवसायाला AI मध्ये रूपांतरित करण्याचा विचार करत आहे. एआयच्या प्रवेशामुळे ॲपल न्यूज विभागही धोक्यात आल्याचे वृत्त आहे.

Appleने याआधीही कर्मचाऱ्यांची कपात केली होती. याआधी कंपनीने आपल्या स्पेशल प्रोजेक्ट ग्रुपमधून ६०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते, तर जानेवारीमध्ये सॅन दिएगोमध्ये १२१ जणांच्या एआय टीमच काम थांबवलं होतं. जुन्या अहवालानुसार ॲपलचे १ लाख ६१ हजार कर्मचारी होते.

अमेरिकन चिप उत्पादक कंपनी इंटेल सध्या वाईट काळातून जात आहे, त्यामुळे नोकऱ्या गमावण्याचे थेट परिणाम त्यांच्या कर्मचाऱ्यांना भोगावे लागत आहेत. कॉस्ट कटिंगच्या नावाखाली कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या १५% कमी केली. या अंतर्गत १५००० लोकांना नोकरी गमवावी लागली. दुस-या तिमाहीत महसुलात मोठी घट झाल्याने आणि भविष्यात व्यवसाय झेप घेणार नाही या भीतीने कंपनीने हा निर्णय घेतला.

इंटेलचे सीईओ पॅट गेल्सिंगर यांनी कामावरून काढलेल्या कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या नोटमध्ये म्हटले आहे की, "आम्ही २०२५ पर्यंत १० अब्ज डॉलर्सच्या खर्चात बचत करण्याची योजना आखत आहोत आणि यासाठी आम्हाला सुमारे १५,००० कर्मचारी किंवा आमच्या कर्मचाऱ्यांपैकी १५ टक्के कर्मचारी कमी करावे लागतील.

टॅग्स :नोकरी