मुकेश अंबानी यांची रिलायन्स जिओ ही भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. सध्या भारतातील बहुतांश युजर्स जिओचं नेटवर्क वापरत आहेत. वास्तविक, जिओनं आपल्या दोन प्रीपेड प्लॅनच्या वैधतेत बदल केला आहे. जिओच्या १९ रुपयांच्या रिचार्ज प्लान आणि २९ रुपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये हा बदल करण्यात आलाय. हे दोन्ही प्लॅन जिओचे डेटा व्हाउचर प्लॅन आहेत.
यापूर्वी जिओचा १९ रुपयांचा प्लॅन १५ रुपयांना मिळत होता. तर जिओचा २९ रुपयांचा प्लान २५ रुपयांना उपलब्ध होता. जिओने आपल्या १९ आणि २९ रुपयांच्या प्लानची वैधता कमी केली आहे. त्यामुळे जिओ युजर्सना याचा फटका बसू शकतो.
१९ रुपयांच्या प्लॅनमध्ये काय बदल?
जिओचा १९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन पूर्वी ७० दिवसांची वैधता असलेल्या प्लॅनसोबत वैध होता, म्हणजेच जोपर्यंत तुमच्याकडे ७० दिवसांची वैधता असलेला अॅक्टिव्ह प्लॅन आहे तोपर्यंत तुम्ही १९ रुपयांच्या प्लॅनचा लाभ घेऊ शकता, पण आता या प्लॅनची वैधता कमी करून फक्त १ दिवस करण्यात आली आहे. याशिवाय प्लानमध्ये मिळणारे बेनिफिट्स तेवढेच राहतील.
२९ रुपयांच्या प्लॅनमध्ये काय बदल?
जिओच्या २९ रुपयांच्या प्लॅनची वैधताही कमी करण्यात आली आहे. यापूर्वी या प्लानमध्ये अॅक्टिव्ह प्लॅनइतकीच वैधता मिळत होती, पण आता ती बदलून २ दिवस करण्यात आलीये. त्याचबरोबर प्लॅनमध्ये मिळणारे फायदे पूर्वीसारखेच राहतील.