Join us

Infosys चं कर्मचाऱ्यांसाठी नवं फर्मान, १० मार्चपासून लागू होणार नवी पॉलिसी; काय दिलेत आदेश?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 12:23 IST

Infosys WFH Policy Update 2025: काही दिवसांपूर्वी आपल्या ३०० पेक्षा अधिक फ्रेशर्सना काढण्यावरुन देशातील दिग्गज आयटी कंपनी इन्फोसिस चर्चेत आली होती. परंतु आता पुन्हा एकदा इन्फोसिस आपल्या एका निर्णयामुळे चर्चेत आलीये.

Infosys WFH Policy Update 2025: काही दिवसांपूर्वी आपल्या ३०० पेक्षा अधिक फ्रेशर्सना काढण्यावरुन देशातील दिग्गज आयटी कंपनी इन्फोसिस चर्चेत आली होती. याची श्रम विभागानंही दखल घेतली होती. परंतु आता पुन्हा एकदा इन्फोसिस आपल्या एका निर्णयामुळे चर्चेत आलीये. इन्फोसिसनं आपल्या कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होम (WFH) मर्यादित करण्याचा निर्णय घेतलाय. कंपनीनं आपल्या अटेंडन्स सॉफ्टवेअरमध्ये बदल करत असल्याचं जाहीर केलं असून आता कर्मचारी दर महिन्याला किमान १० दिवस ऑफिसमधून काम करतील याची खात्री केली जाईल. हे नवं धोरण १० मार्च २०२५ पासून लागू होणार आहे.

इकॉनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार, इन्फोसिसच्या या नव्या नियमांतर्गत कर्मचाऱ्यांसाठी घरून काम करण्याचे दिवस मर्यादित असतील. कंपनीनं आपल्या फंक्शनल हेड्सना यासंदर्भात एक ईमेलही पाठवलाय. ‘१० मार्च २०२५ पासून कर्मचाऱ्यांचं वर्क फ्रॉम होम मर्यादित करण्यासाठी सिस्टममध्ये बदल केले जातील. नवीन हायब्रीड वर्क मॉडेलचं पालन सुनिश्चित करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे, ज्यामुळे कर्मचाऱ्यांना लवचिकता देखील मिळेल,’ असं यात नमूद करण्यात आलंय.

कोणत्या कर्मचाऱ्यांवर होणार परिणाम?

परंतु, हे धोरण मॅनेजर, सीनिअर मॅनेजर, डिलिव्हरी मॅनेजर आणि सीनिअर डिलिव्हरी मॅनेजर पदांवर कार्यरत JL6 आणि त्यावरील कर्मचाऱ्यांना लागू होणार नाही. उपाध्यक्ष दर्जाचे अधिकारीही (Vice President) या नियमातून बाहेर असतील.

अटेंडन्स अॅपमध्ये होणार बदल

आतापर्यंत इन्फोसिसचे कर्मचारी मोबाइल अॅपच्या माध्यमातून आपली उपस्थिती नोंदवत होते, ज्यात वर्क फ्रॉम होमचा पर्याय सहज उपलब्ध होता. पण नव्या बदलांमुळे हा पर्याय आता आपोआप मंजूर होणार नाही. कर्मचाऱ्यांना आता १० दिवसांची अनिवार्य उपस्थिती पूर्ण केल्यानंतरच वर्क फ्रॉम होमसाठी अर्ज करता येणार आहे. “हा बदल कोणत्याही विशिष्ट विभागाची किंवा युनिटची गरज नसून संपूर्ण प्रोजेक्टची गरज लक्षात घेऊन करण्यात आला आहे,” असं कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं.