Join us

ईशा, आकाश, अनंत... मुकेश अंबानींच्या तीन मुलांपैकी सर्वाधिक श्रीमंत कोण? कोणाची किती आहे सॅलरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 09:00 IST

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचं नाव देशातील आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि दिग्गज उद्योजक म्हणून घेतलं जातं. मुकेश अंबानी यांची तीन मुलं ईशा अंबानी, आकाश अंबानी आणि अनंत अंबानी ही देखील कमी श्रीमंत नाहीत.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचं नाव देशातील आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि दिग्गज उद्योजक म्हणून घेतलं जातं. ब्लूमबर्ग बिलियनेयर्स इंडेक्सनुसार मुकेश अंबानी ८६.८ अब्ज डॉलरच्या संपत्तीसह जगातील १७ वे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. पण जेव्हा त्यांच्या मुलांचा प्रश्न येतो, तर तेही कोणापेक्षा कमी नाहीत. मुकेश अंबानी यांची तीन मुलं ईशा अंबानी, आकाश अंबानी आणि अनंत अंबानी ही देखील कमी श्रीमंत नाहीत. ही तिन्ही मुलं रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात.

ईशा अंबानी

ईशा अंबानी मुकेश अंबानी यांची मुलगी आहे. त्या आणि आकाश अंबानी ही जुळी भावंड आहेत. ईशा अंबानी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या संचालक मंडळावर नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर पदावर आहेत. त्या रिलायन्स रिटेल, रिलायन्स जिओ आणि रिलायन्स फाऊंडेशनच्या एक्झिक्युटिव्ह लीडरशिप टीमच्या प्रमुख सदस्य आहेत. याशिवाय ईशा ही तिरा ब्युटीची एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आणि को-फाउंडर आहे. धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलच्या व्यवस्थापनातही त्यांचा मोठा वाटा आहे. ईशा यांचं वार्षिक उत्पन्न सुमारे ४.२ कोटी रुपये आहे. त्यांची नेटवर्थ ८०० कोटी रुपये आहे.

आकाश अंबानी

आकाश अंबानी हे रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडचे चेअरमन आहेत. ते रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडच्या संचालक मंडळाचे संचालकही आहेत. टाईम्स नाऊनं मीडिया रिपोर्ट्सच्या हवाल्यानं दिलेल्या वृततानुसार, आकाश यांचा वार्षिक पगार जवळपास ५.६ कोटी रुपये आहे. तर त्यांची एकूण संपत्ती ४०.१ अब्ज डॉलर (सुमारे ३,३२,८१५ कोटी रुपये) असल्याचं सांगितलं जात आहे.

अनंत अंबानी

अनंत अंबानी हे मुकेश अंबानी यांचे धाकटे चिरंजीव आहेत. ते रिलायन्स जिओमध्ये एनर्जी आणि दूरसंचार क्षेत्रातील काम पाहतात. जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड आणि रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडच्या संचालक मंडळावर ते संचालक म्हणूनही काम करतात. अनंत यांना वार्षिक ४.२ कोटी रुपये पगार मिळतो. त्यांची संपत्ती ४० अब्ज डॉलर (सुमारे ३,३२,४८२ कोटी रुपये) असल्याचं सांगितलं जातं.

सर्वात श्रीमंत कोण?

मुकेश अंबानी यांच्या तीन मुलांपैकी आकाश अंबानी सर्वात श्रीमंत आहेत. अनंत अंबानी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. ईशा अंबानींचं नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र, मुकेश अंबानी यांनी आपल्या तीन मुलांवर कंपनीची जबाबदारी सोपवली आहे. आपल्या मुलांना व्यवसायात मदत करण्यासाठी ते वेळोवेळी पुढे येतात.

टॅग्स :मुकेश अंबानीईशा अंबानीआकाश अंबानीअनंत अंबानी