Join us

IRCTC चे दमदार कमबॅक! शेअर गडगडले; पण दुसऱ्या तिमाहीत झाला १५८ कोटींचा निव्वळ नफा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2021 23:14 IST

IRCTC Q2 Result: चालु आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत आयआरसीटीसीला तब्बल १५८ कोटींचा निव्वळ नफा झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

नवी दिल्ली: इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या शेअर्सनं (IRCTC) या वर्षी आतापर्यंत ३०० टक्क्यांनी उसळी घेतली होती. यानंतर १ ट्रिलियन रुपयांच्या मार्केट कॅपच्या एलिट क्लबमध्ये सामील होणारी सार्वजनिक क्षेत्रातील नववी कंपनी बनली होती. मात्र, आता गेल्या दहा दिवसांपासून IRCTC चे शेअर्स मोठ्या प्रमाणात गडगडले. यामुळे गुंतवणूकदारांचे ३० हजार कोटी रूपयांपेक्षाही अधिक नुकसान झाले आहे. तरीही चालु आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत IRCTC ला तब्बल १५८ कोटींचा निव्वळ नफा झाल्याची माहिती देण्यात आली आहे. (IRCTC Q2 Result)

IRCTC ने चालु आर्थिक वर्षाच्या जुलै ते सप्टेंबर या दुसऱ्या तिमाहीतील आकडेवारी जाहीर केली आहे. यानुसार, आयआरसीटीसीच्या नफ्यात ३८६ टक्क्यांची वाढ झाली असून, गेल्या वर्षी याच कालावधीत आयआरसीटीसीला ३२.६ टक्के नफा झाला होता. गेल्या वर्षी कोरोना संकटामुळे रेल्वे सेवेवर मोठा परिणाम झाला होता. त्यामुळे आयआरसीटीसीला कमी उत्पन्न मिळाले असे सांगितले जात आहे. 

IRCTC च्या महसुलात ३५७ टक्क्यांची घसघशीत वाढ

IRCTC च्या महसुलात सप्टेंबरच्या तिमाहीत घसघशीत वाढ झाल्याची माहिती देण्यात आली आहे. आयआरसीटीसीच्या महसुलात ३५७ टक्क्यांची वाढ होऊन तो ४०५ कोटी रुपयांवर गेल्याचे सांगितले जात आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत हा महसूल ८८.५ कोटी रुपये होता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी झाल्यानंतर रेल्वेसेवा पुन्हा पूर्ववत करण्यात आली. याचा मोठा फायदा आयआरसीटीसी कंपनीला झाला, असे सांगितले जात आहे. याशिवाय आयआरसीटीसीला इंटरनल सेगमेंटमध्येही मोठा फायदा मिळाला आहे. इंटरनल सेगमेंटमध्ये आयआरसीटीसी कंपनीचे उत्पन्न वाढून २६५ कोटी झाले आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ते ५८.२ कोटी होते. 

IRCTC ला कॅटरिंग सेवेतही मोठा फायदा

IRCTC ची कॅटरिंग सेवाही पूर्वपदावर आल्याचे सांगितले जात आहे. यातून आयआरसीटीसीला चौपट नफा झाला आहे. सप्टेंबर महिन्याच्या तिमाहीत आयआरसीटीसीची कॅटरिंग बिझनेसमधून तब्बल ७१.४ कोटींची कमाई झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ही कमाई १७ कोटी रुपये होती. 

दरम्यान, सरकारने भारतीय रेल्वेच्या ऑनलाइन शाखेला आपल्या इंटरनेट बुकिंगच्या सेवा शुल्काचा अर्धा हिस्सा शेअर करण्याचे निर्देश दिले होते. आयआरसीटीला रेल्वे मंत्रालयासोबत आपल्या वेबसाईटवरून येणाऱ्या बुकिंगमधून सेवा शुल्काच्या स्वरूपात मिळणाऱ्या महसूलाचा ५० टक्के सेवा शुल्काच्या रूपात शेअर करण्यास सांगण्यात आले होते. ही प्रक्रिया कोरोनानंतर बंद करण्यात आली होती. परंतु ही माहिती समोर येताच आयआरसीटीसीचे शेअर्स आपटले होते. मात्र, सरकारने आपला आदेश मागे घेतला असला तरी त्यानंतरही बीएसई इंडेक्सवर आयआरसीटीसीच्या शेअरचा दर ७.४५ टक्क्यांनी घसरून ८४५.६५ रूपयांवर आला असून, कंपनीचे मार्केट कॅपही आता ६७ हजार ६५२ कोटी रूपये झाले आहे. 

टॅग्स :आयआरसीटीसीकेंद्र सरकारभारतीय रेल्वे