Join us  

Share Market Big Fall: नव्या कोरोना व्हेरिअंटचा शेअर बाजारात हाहाकार; काही तासांत 6.55 लाख कोटी उडाले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 3:33 PM

new corona Variant Effect on Share Market: नवीन व्हेरिअंट साऊथ आफ्रिकेत सापडला  (Coronavirus New Variant) असला तरी तो वेगाने प्रसार करत असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे जगावर पुन्हा लॉकडाऊनचे मळभ जमू लागल्याचा परिणाम शेअर बाजारावर झाला आहे.

तिकडे दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा व्हेरिअंट सापडल्याचे वृत्त आले आणि इकडे भारतात शेअरबाजार गडगडला आहे. आज शेअर बाजार 1687.94 अंकांनी घसरला आहे. यामुळे सुरुवातीच्या दोन तासांत गुंतवणूकदारांचे 6.55 लाख कोटी रुपये उडाले आहेत. सेन्सेक्सचे बाजार भांडवल 265.66 लाख कोटी रुपयांवरून 259.11 लाख कोटी रुपयांवर घसरले.

आज सेन्सेक्स 541 अंकांच्या मोठ्या घसरणीसह 58,254.79 अंकांवर उघडला आणि ही घसरण वाढतच गेली. परिस्थिती अशी बनली की सेन्सेक्स 1400 अंकांपेक्षा अधिक घसरला. दिवसाच्या व्यवहारात सेन्सेक्स 57,107.15 अंकांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. 

दुसरीकडे निफ्टीचीही स्थिती तशीच राहिली. गुरुवारी 17,536.25 वर बंद झालेला निफ्टी सुमारे 198 अंकांनी घसरून 17,338.75 अंकांवर उघडला. त्यानंतरच्या व्यवहारात ही घसरण आणखी वाढली आणि लवकरच बाजार 17,088 च्या पातळीवर घसरला. म्हणजेच निफ्टीमध्ये 350 हून अधिक अंकांची घसरण पाहायला मिळाली.

ही घसरण कोरोना व्हायरसच्या नव्या व्हेरिअंटमुळे असल्याचे सांगितले जात आहे.  नवीन व्हेरिअंट साऊथ आफ्रिकेत सापडला  (Coronavirus New Variant) असला तरी तो वेगाने प्रसार करत असल्याचे सांगितले जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे या व्हेरिअंटचे आजवर 30 हून अधिकवेळा म्युटेशन झाले आहे. या व्हेरिअंटला B.1.1.529 नाव देण्यात आले आहे. नवीन व्हेरिएंट B.1.1529 ची बोत्सवानामध्ये 3, दक्षिण आफ्रिकेत 6 आणि हाँगकाँगमध्ये 1 रुग्णाची नोंद झाली आहे.

लॉकडाऊनची भीतीकोरोनाचा नवा प्रकार समोर आल्यानंतर आता लोकांमध्ये पुन्हा लॉकडाऊनची भीती आहे. अशा परिस्थितीत युरोपीय देशांनीही कोविड-19 बूस्टर लसीकरण वाढवण्यास सुरुवात केली आहे. यासोबतच नियमांमध्येही कडकपणा सुरू केला आहे. स्लोव्हाकियानेही दोन आठवड्यांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. झेक प्रजासत्ताकने लवकरच बार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचवेळी, जर्मनीमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 1 लाखांच्या पुढे गेली आहे.

शेअर्सची विक्री सुरु...विदेशी गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात विक्री सुरू केली आहे. एनएसईच्या आकडेवारीनुसार, एफआयआयने सुमारे 2300 कोटी रुपयांचे समभाग विकले आहेत. दुसरीकडे, डीआयआय या विक्रीपेक्षा खूपच कमी खरेदी करत आहेत, ज्यामुळे घट वाढत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे प्रमाण वाढत असून ते वेगाने पैसे बाहेर काढत आहेत.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याशेअर बाजार