Join us
Daily Top 2Weekly Top 5

युद्धामुळे गुंतवणूकदार सावध, आता पुढे काय?

By प्रसाद गो.जोशी | Updated: June 16, 2025 13:50 IST

विविध देशांच्या बँकांकडून होणारी व्याजदराबाबत घोषणा आणि इराण- इस्रायल संघर्षाकडे बाजाराचे लक्ष लागून आहे

प्रसाद गो. जोशी: विविध देशांच्या बँकांकडून होणारी व्याजदराबाबत घोषणा आणि इराण- इस्रायल संघर्षाकडे बाजाराचे लक्ष लागून आहे. तेथील स्थिती बघूनच बाजाराची वाटचाल होणार आहे. अमेरिका व ब्रिटनकडून जाहीर होणारे व्याजदर आणि युद्धाची परिस्थिती काय राहील, यावर बाजाराची वाटचाल अवलंबून आहे. याशिवाय कच्च्या तेलाचे वाढलेले दर आणि मान्सूनची वाटचाल यावरही बाजाराचे लक्ष राहणार आहे. संघर्षामुळे गुंतवणूकदार हे अधिक सजग झाले आहेत. ते गुंतवणूक करताना अतिशय सावध असून, कोणताही धोका पत्करायला तयार असलेले दिसत नाहीत.

या सप्ताहामध्ये बुधवारी अमेरिकेतील व्याजदरांची घोषणा होणार आहे. त्याकडे गुंतवणूकदारांची नजर असेल. या जोडीलाच जपान आणि ब्रिटनमधील व्याजदरांची घोषणा होणार आहे. इराण- इस्रायल संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या दरामध्ये मोठी वाढ झालेली दिसून आली. त्यामुळे आगामी काळामध्ये तेलाचे दर वाढण्याची शक्यता आहे. त्याचा  बाजारावर परिणाम होणारा आहे. 

पहिल्या आठ कंपन्यांचे बाजारमूल्य घटले

शेअर बाजारामध्ये गतसप्ताहात बरीच घट झालेली बघावयास मिळाली. बाजारातील पहिल्या दहा कंपन्यांपैकी आठ कंपन्यांचे बाजारमूल्य १ लाख ६५ हजार ५०१.४९ कोटी रुपयांनी घटले आहे. 

सर्वाधिक नुकसान एचडीएफसी बँकेचे झाले आहे. पहिल्या दहा कंपन्यांपैकी केवळ टीसीएस व इन्फोसिस या दोन कंपन्यांचे बाजार भांडवलमूल्य वाढले आहे. 

रिलायन्स इंडस्ट्रीज, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक, एलआयसी, बजाज फायनान्स व हिंदुस्थान युनिलिव्हर या कंपन्यांचे बाजार भांडवल कमी झाले आहे.

टॅग्स :गुंतवणूकव्यवसाययुद्ध