Join us  

सोन्यातील गुंतवणूक किती फायद्याची?... 'हे' मुद्दे लक्षात घ्या! 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2018 3:54 PM

गुरुपुष्यामृत किंवा अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करणं लाभदायक असतं, असं मानणारा मोठा वर्ग आपल्याकडे आहे.

मुंबईः अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करण्याची परंपरा पूर्वापार चालत आलीय आणि यंदाही 'अक्षय्य' मुहूर्तावर सोन्याची दुकानं झळाळून निघणार आहेत. सोनं ३२ हजाराच्या पुढे गेलं असतानाही 'मुहूर्ताची खरेदी' म्हणून बव्हंशी मंडळी आपापल्या ताकदीनुसार उद्या सोनं घेतील. पण, गुंतवणूक म्हणून सोनंखरेदीकडे पाहत असाल तर काही मुद्द्यांचा विचार करणं गरजेचं आहे. 

गुरुपुष्यामृत किंवा अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करणं लाभदायक असतं, असं मानणारा मोठा वर्ग आपल्याकडे आहे. हा ज्याच्या-त्याच्या श्रद्धेचा, भावनेचा विषय आहे आणि त्यात आपण कुणाला चूक-बरोबर ठरवणं योग्य नाही. परंपरेचं जतन आणि हौस, या दोन मुद्द्यांचा त्यात अंतर्भाव होतो. पण, गुंतवणूक करताना भावनेच्या आहारी जाऊन उपयोगाचे नाही. तिथे आपण प्रॅक्टिकल असायला हवं. गुंतवणुकीसाठी सोनं घेताना मुहूर्तापेक्षा योग्य वेळ पाहायला हवी. 

गेल्या तीन-चार वर्षांचा विचार केल्यास सोन्याच्या किंमतीत लक्षणीय वाढ झालेली पाहायला मिळत नाही. आंतरराष्ट्रीय बाजारातील खनिज तेलाच्या किंमती, डॉलरचा विनिमयदर आणि भारतीय शेअर बाजाराची परिस्थिती या घटकांचा परिणाम सोन्याच्या दरांवर होत असतो. भारतात नेहमीच सोन्याच्या पुरवठ्यापेक्षा मागणी जास्त असल्यानं आपल्याला सोनं आयात करावं लागतं. आत्ताच्या सोन्याच्या दरवाढीमागे अक्षय्य तृतीया हे कारण नसून अमेरिकेचे सीरियावरील हल्ले हे कारण आहे. त्यामुळे येत्या काळात सोन्याला झळाळी येईलच, हे सांगता येत नाही. २८ हजार ते ३०-३१ हजाराच्या आसपास सोन्याचा दर फिरतोय. त्यामुळे सोनं ३२,५०० रुपयांवर असताना त्यात गुंतवणूक करणं थोडं जोखमीचंच आहे. 

ETF गोल्डमधील गुंतवणूक

काही जण शुभ मुहूर्त पाहून सोन्याची वळी खरेदी करतात आणि नंतर ही वळी मोडून त्याचा दागिना बनवून घेतात. हा हौसेचा भाग आहे आणि हौसेला मोल नसतं. त्यामुळे उद्या अक्षय्य तृतीयेला चढ्या भावानेही खरेदी करायला हरकत नाही. नाहीतर थोडी वाट पाहा. ईटीएफ (एक्स्चेंज ट्रेडेड फंड) गोल्डमध्ये नियोजनबद्ध पद्धतीने आपण पैसे गुंतवू शकतो. डी मॅट अकाउंटद्वारे हा फंड खरेदी करता येतो आणि सोन्याच्या रकमेइतके युनिट आपल्या खात्यात जमा होतात. भाव वाढला की हा फंड आपण विकू शकतो. सोन्यातील ही ऑनलाइन गुंतवणूकच आहे. त्यामुळे सोनं कुठं ठेवायचं, कसं सांभाळायचं याची काळजीही राहत नाही.  

टॅग्स :अक्षय तृतीयासोनंगुंतवणूक