कम्प्युटर चिप्स बनवणारी जगातील आघाडीची आयटी कंपनी इंटेल (Intel) आता आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार आहे. रिपोर्ट्सनुसार, इंटेल या वर्षाच्या अखेरीस आपल्या २५,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार असल्याची माहिती समोर आलीये. खरंतर, इंटेल कंपनी गेल्या काही काळापासून खूप कठीण परिस्थितीचा सामना करत आहे. अशा परिस्थितीत, कंपनीचा हा निर्णय तिच्या बाजारात पुन्हा एन्ट्री करण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
२०२५ च्या अखेरीस कर्मचारी कपात
गेल्या वर्षाच्या अखेरीस इंटेलच्या कर्मचाऱ्यांची संख्या १,०८,९०० होती पण आता ही संख्या कमी होईल. २०२५ च्या अखेरीस कर्मचाऱ्यांची ही संख्या ७५,००० पर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत, कंपनी आपल्या २५,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची तयारी करत आहे. यापूर्वी, इंटेलनं एप्रिल २०२५ मध्ये कंपनीच्या खर्चात कपात करण्याचे संकेत दिले होते आणि १५ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार असल्याचं म्हटलं होतं.
UPI मोफत राहणार नाही? RBI गव्हर्नर संजय मल्होत्रांचा इशारा; म्हणाले, "कोणालातरी खर्च..."
इंटेलला मोठा तोटा
इंटेलनं दुसऱ्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करताना कर्मचाऱ्यांची ही कपात जाहीर केली आहे. या कालावधीत, कंपनीला २.९ अब्ज डॉलर्सचा निव्वळ तोटा झाला आहे. यामध्ये अलिकडच्या कपातीमुळे झालेले पुनर्रचना शुल्क देखील समाविष्ट आहे. या तिमाहीत कंपनीचा महसूल १२.९ अब्ज डॉलर्सवर स्थिर राहिला. कंपनीनं चालू तिमाहीत १२.६ अब्ज डॉलर्स ते १३.६ अब्ज डॉलर्स दरम्यान महसूल मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे. सप्टेंबरमध्ये संपणाऱ्या तिमाहीत महसूल १२.६ अब्ज डॉलर्स असू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आलाय.
"गेले काही महिने सोपे नव्हते हे मला माहिती आहे. कंपनीच्या प्रत्येक स्तरावर संघटना सुव्यवस्थित करण्यासाठी, अधिक कार्यक्षमता वाढविण्यासाठी आणि जबाबदारी वाढवण्यासाठी आम्ही कठीण परंतु आवश्यक निर्णय घेत आहोत," असं इंटेलचे सीईओ लिप बू टॅन यांनी कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय. आता जर्मनी आणि पोलंडमध्ये प्रकल्प उभारण्याची योजना स्थगित केली आहे. याव्यतिरिक्त, ओहायोमध्ये नवीन प्रकल्पांचा वेग देखील मंदावणार आहे.