Join us
Daily Top 2Weekly Top 5

13000 कोटी रुपयांचे शेअर्स बायबॅक करण्याची इन्फोसिसच्या संचालक मंडळाची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2017 12:50 IST

आयटी मध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या इन्फोसिस या कंपनीच्या संचालक मंडळाने इन्फोसिसचे 13000 कोटी रुपये किमतीचे शेअर बाय बॅक करण्याचा किंवा बाजारातून विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देप्रति शेअर 1150 रुपये या दराने हा सौदा होणार असल्याचे संचालक मंडळाने शनिवारी जाहीर केले. बाय बॅक करताना कंपनीने 25 टक्क्यांचा प्रीमियम देऊ केला आहे.

मुंबई, दि. 19 - आयटी मध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या इन्फोसिस या कंपनीच्या संचालक मंडळाने इन्फोसिसचे 13000 कोटी रुपये किमतीचे शेअर बाय बॅक करण्याचा किंवा बाजारातून विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. प्रति शेअर 1150 रुपये या दराने हा सौदा होणार असल्याचे संचालक मंडळाने शनिवारी जाहीर केले. विशाल सिक्का यांनी सीईओपदाचा राजीनामा दिल्यानंतर इन्फोसिसचा शेअर तब्बल 13 टक्क्यांनी आपटला आणि सुमारे 30 हजार कोटी रुपयांचे भागभांडवल हवेत विरले. शुक्रवारी बाजार बंद होताना इन्फोसिसच्या शेअरचा भाव 923.10 रुपयांवर स्थिरावला, याचा अर्थ बाय बॅक करताना कंपनीने 25 टक्क्यांचा प्रीमियम देऊ केला आहे.इन्फोसिसकडे सुमारे 40 हजार कोटी रुपयांची रोख शिल्लक असून त्यातून ही खरेदी करण्यात येणार आहे. यापूर्वी टीसीएस आणि विप्रो या आयटी कंपन्यांनीही अनुक्रमे 16 हजार कोटी व 11 हजार कोटी रुपयांचे शेअर बायबॅक करण्याचे जाहीर केले होते.

सिक्का यांनी शुक्रवारी दिला इन्फोसिसच्या सीईओपदाचा राजीनामा

सातत्याने होत असलेल्या खोट्या, निराधार, बदनामीकारक आणि वैयक्तिक हल्ल्यांमुळे आपण राजीनामा देत असल्याचे सांगत इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) विशाल सिक्का यांनी कंपनीला रामराम ठोकला. विशेष म्हणजे, कंपनीचे सहसंस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांच्याकडून सातत्याने होत असलेल्या आरोपांना कंटाळून सिक्का यांनी राजीनामा दिला असल्याचे कंपनीच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.दोन लाखांहून अधिक कर्मचारी असलेल्या इन्फोसिसच्या नवीन एमडी आणि सीईओंची नियुक्ती आता ३१ मार्च २0१८ पर्यंत करण्यात येणार आहे. तोपर्यंत विद्यमान परिचालन अधिकारी प्रवीण राव यांची हंगामी सीईओ म्हणून नेमणूक करण्यात आली. कंपनीचे काम सुरळीत चालावे, यासाठी सिक्का काही काळ कार्यकारी उपाध्यक्षपदी राहतील. वार्षिक १ डॉलर वेतनावर ते नव्या सीईओचा शोध घेण्यास मदत करणार आहेत.सिक्का यांनी राजीनाम्यात मूर्ती यांचे नाव घेतले नाही. नारायणमूर्ती यांनी आपल्यावरील आरोपांचा इन्कार केला आहे. त्यांनी म्हटले की, या हल्ल्यांमुळे आपण व्यथित झालो आहोत. निराधार आक्षेपांना उत्तरे देणे आपल्या सन्मानाला शोभणारे नाही.

 

टॅग्स :राजीनामा