Join us
Daily Top 2Weekly Top 5

Welcome 2021: उद्योग-व्यवसाय पकडणार गती; क्रयशक्ती वाढल्याचा सकारात्मक परिणाम दिसणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2021 15:41 IST

कोरोनावरील लस बाजारात आल्यानंतर अर्थव्यवस्था विकासाचा वेग आणखी वाढेल. ९.५ टक्के दराने आर्थिक विकास होईल, असा तज्ज्ञांचा होरा आहे.

कोरोनामुळे वेगाला लागलेला ब्रेक मागे सारत यंदा अर्थव्यवस्था भरारी घेईल, असा विश्वास आहे. कोरोनावरील लस बाजारात आल्यानंतर अर्थव्यवस्था विकासाचा वेग आणखी वाढेल. ९.५ टक्के दराने आर्थिक विकास होईल, असा तज्ज्ञांचा होरा आहे. चीनच्या अर्थव्यवस्थेची गती मंदावून भारत चीनला मागे टाकेल, असाही अंदाज आहे.रिअल इस्टेट यंदाच्या वर्षात रिअल इस्टेट क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती होईल. कोरोनावरील लसीचा परिणाम, बाजारात संचारलेला उत्साह आणि वाढलेली क्रयशक्ती यामुळे रिअल इस्टेट क्षेत्राची यंदा घोडदौड राहील, असा कयास आहे. टाळेबंदीमुळे वर्क फ्रॉम होमचे प्रमाण वाढीस लागले. अनेक आस्थापनांनी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची मुभा दिली असल्याने छोट्या शहरात स्थलांतरित होण्याकडे कल वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर बांधकाम क्षेत्राला यंदा तेजीचे दिवस येतील, असा अंदाज आहे.

औषधनिर्माण  कोरोनावरील प्रभावी उपचारांसाठी औषधांच्या मागणीत वाढ होणार आहे. लसीबरोबरच पूरक औषधांच्या मागणीत वाढ होणार असल्याने यंदाच्या वर्षात औषधनिर्माण कंपन्या तेजीत असतील

सिमेंट, स्टील रिअल इस्टेट क्षेत्रातील तेजीमुळे यंदाच्या वर्षात सिमेंट आणि स्टील यांच्या मागणीत प्रचंड वाढ होईल. 

एमएसएमई मध्यम, लघू आणि सूक्ष्म उद्योग क्षेत्रासाठी यंदाचे वर्ष भरभराटीचे ठरणार आहे. आत्मनिर्भर भारतासाठी केंद्र सरकार आग्रही असल्याने हे क्षेत्र तेजीचे वर्ष अनुभवणार आहे.

डिजिटल शिक्षणटाळेबंदीत ऑनलाइन शिक्षणाचे महत्त्व जगाला पटले. त्यामुळे यंदा डिजिटल शिक्षणाला अधिक महत्त्व प्राप्त होऊन पुढील काही वर्षात या क्षेत्रात तेजीचे वातावरण असेल.

शेअर बाजार कोरोनाचा अंमल जसजसा ओसरत आला, तसतसा निर्देशांकही ४५ हजारांच्या पुढे झेपावला. यंदाच्या वर्षात निर्देशांक ५० हजारांचा टप्पा ओलांडेल, यात शंका नाही.

इलेक्ट्रिक कार्सची निर्मितीइलेक्ट्रिक कार तशी महागडी चीज. मात्र, या प्रकारच्या गाड्या सामान्यांच्या आवाक्यात येण्यासाठी मारुती, टाटा आणि महिंद्रा या कार उत्पादन कंपन्या सातत्याने प्रयत्न करत आहेत.मारुतीची वॅगन आर ईव्ही, टाटांची अल्ट्रोज ईव्ही आणि महिंद्राची ई-केयूव्ही-१०० या तीन इलेक्ट्रिक कार साधारणत: १० लाख वा त्याहून कमी रकमेत उपलब्ध होतील. कंपन्यांचा नफा वाढणार कोरोनामुळे मंदावलेले उत्पादन, टाळेबंदीमुळे निर्माण झालेली अनिश्चितता यामुळे औद्योगिक उत्पादन करणाऱ्या कंपन्यांची आर्थिक उलाढाल ठप्प पडली होती. मात्र, आता पुन्हा उत्पादनाने वेग घेतला असून, यंदाच्या वर्षात कंपन्या प्रचंड उत्पादन करून नफ्यात वाढ करतील, अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :अर्थव्यवस्थानववर्ष