Join us

औद्योगिक क्षेत्राचा वृद्धिदर २.४ टक्क्यांवर घसरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2019 01:28 IST

देशाचे औद्योगिक उत्पादन डिसेंबर २०१८ मध्ये घसरून २.४ टक्के झाले. खाण क्षेत्रातील घसरण व वस्तू उत्पादन क्षेत्राच्या सुमार कामगिरीचा फटका औद्योगिक उत्पादनास बसला. गेल्या वर्षी ते ७.३ टक्के होते.

नवी दिल्ली : देशाचे औद्योगिक उत्पादन डिसेंबर २०१८ मध्ये घसरून २.४ टक्के झाले. खाण क्षेत्रातील घसरण व वस्तू उत्पादन क्षेत्राच्या सुमार कामगिरीचा फटका औद्योगिक उत्पादनास बसला. गेल्या वर्षी ते ७.३ टक्के होते. लोकांकडे पैसा नसल्याने काही महिन्यांत बाजारात विविध वस्तूंची मागणी घटली. तसेच औद्योगिक क्षेत्रातील गुंतवणूकही मोठ्या प्रमाणात घसरल्याचा फटका निर्देशांकाला बसला.कारखाना उत्पादन हे औद्योगिक उत्पादन निर्देशांकाच्या (आयआयपी) माध्यमातून मोजले जाते. सांख्यिकी कार्यालयानुसार, डिसेंबर २०१७ मध्ये ते ७.३ टक्के होते. दरम्यान, नोव्हेंबर २०१८ मधील आयआयपीची आकडेवारी सुधारून ०.३ टक्के करण्यात आली. आधी ती ०.५ टक्के गृहीत धरली होती. एप्रिल-डिसेंबर २०१८-१९ मध्ये औद्योगिक उत्पादन ४.६ टक्के होते. आदल्या वर्षी ते ३.७ टक्के होते. आयआयपीमध्ये वस्तू उत्पादन क्षेत्राचा वाटा ७७.६३ टक्के आहे. या क्षेत्राचा डिसेंबरमधील वृद्धीदर घसरून २.७ टक्क्यांवर आला. आदल्या वर्षी याच महिन्यात तो ८.७ टक्के होता. खाण क्षेत्राचे उत्पादन घसरून १ टक्क्यांवर आले. डिसेंबर २०१७ मध्ये ते १.२ टक्का होते. ऊर्जा क्षेत्रातील वृद्धी ४.४ टक्क्यांवर स्थिर राहिली. भांडवली वस्तूंची उत्पादन वृद्धी ५.९ टक्के राहिली. आधी ती ती १३.२ टक्के होती. टिकाऊ ग्राहक वस्तू क्षेत्राचा वृद्धीदर वाढून २.९ टक्के झाला. आदल्या वर्षात तो २.१ टक्के होता. डिसेंबर २०१८ मध्ये बिगर टिकाऊ ग्राहक वस्तू क्षेत्राचा वृद्धीदरही घसरून ५.३ टक्के झाला.

टॅग्स :व्यवसाय