Join us  

महागाईचा फटका! खाद्यतेलाच्या किमती आणखी वाढणार; इंडोनेशियाने वाढवल्या भारताच्या अडचणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2022 2:24 PM

Indonesian palm oil export ban : इंडोनेशियाने फ्युचर्स ट्रेडिंगमध्ये निर्यात बंदी जाहीर केल्यापासून पाम तेल 6 टक्क्यांनी महाग झाले आहे.

नवी दिल्ली : पाम तेलाचा (Palm Oil) सर्वात मोठा उत्पादक असलेल्या इंडोनेशियाच्या निर्यातीवर बंदी घालण्याच्या घोषणेमुळे जगात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या या खाद्यतेलाच्या किमतीत (Edible Oil Prices) वाढ झाली आहे. तसेच, यापुढेही खाद्यतेल आणखी महाग होण्याची शक्यता आहे. इंडोनेशियाने फ्युचर्स ट्रेडिंगमध्ये निर्यात बंदी जाहीर केल्यापासून पाम तेल 6 टक्क्यांनी महाग झाले आहे.

दुसरीकडे, भारतात येत्या काही दिवसांत पाम तेलाच्या किमतीत  (Palm Oil Price) आणखी 10 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. पाम तेलाच्या वाढत्या किमतींचा परिणाम इतर शुद्ध तेलांवरही होणार आहे. पाम तेलासह इतर खाद्यतेल आधीच महाग झाले आहे. ग्राहक किंमत निर्देशांक डेटावरून (CPI) असे दिसून येत की, वर्षभराच्या आधारावर मार्चमध्ये खाद्यतेलाच्या किमती 19 टक्क्यांनी वाढल्या आहेत. तसेच, 2021-22 या आर्थिक वर्षात खाद्यतेलाचे दर 27.4 टक्क्यांनी वाढले आहेत.

आणखी वाढणार दरइंडोनेशियाच्या निर्यातीवर बंदी घातल्याने खाद्यतेलाच्या किमती 10 टक्क्यांनी वाढू शकतात. आधीच वाढलेल्या किमतींमुळे भारताचे खाद्यतेलाचे आयात बिल 72 टक्क्यांनी वाढले आहे. भारताने 2022 या आर्थिक वर्षात खाद्यतेलाच्या आयातीवर 1.4 लाख कोटी रुपये खर्च केले आहेत, जे मागील वर्षी 82,123 कोटी रुपये होते, असे सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष अतुल चतुर्वेदी म्हणाले. 

पाम तेलाची सर्वाधिक मागणीजगातील पाम तेलाच्या पुरवठ्यापैकी 60 टक्के वाटा इंडोनेशियाचा आहे. भारतासह जगातील अनेक देश आपल्याला आवश्यक असलेले पामतेल आयात करतात. सोयाबीन आणि सूर्यफूल तेलापेक्षा पाम तेल खूपच स्वस्त आहे. त्यामुळे त्याला जगात सर्वाधिक मागणी आहे. जगभरात पाम तेलाचा सर्वाधिक वापर केला जातो. खाद्यतेलाच्या एकूण वापरात पाम तेलाचा हिस्सा 40 टक्के आहे.

पीक खराब झाल्यामुळे अडचणी वाढल्याअर्जेंटिनामध्ये पीक खराब झाल्यामुळे सोया तेलाचे भावही चढे आहेत. अर्जेंटिनाने सोया तेलाच्या निर्यातीवर काही काळ बंदी घातली. तसेच कॅनडा आणि युरोपमध्येही कॅनोला पिकाचे नुकसान झाले आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे सूर्यफूल तेलाची निर्यातही खंडित झाली आहे. या सर्व कारणांमुळे यंदा खाद्यतेलाचे भाव भडकले आहेत. त्यामुळे भाव आणखी वाढण्याची शक्यता बाजारातील जाणकार व्यक्त करत आहेत.

60 टक्के खाद्यतेलाची आयात भारत आपल्या गरजेच्या 60 टक्के खाद्यतेलाची आयात करतो. फेब्रुवारीमध्येच भारताने कच्च्या पाम तेलाच्या आयातीवरील कर 7.5 टक्क्यांवरून 5 टक्क्यांवर आणला जेणेकरून देशांतर्गत बाजारात पाम तेलाच्या किमती नियंत्रणात ठेवता येतील. इंडोनेशियाने पाम तेलाच्या निर्यातीवर बंदी घातल्यानंतर भारतात पॅकेज्ड फूड आणि खाद्यतेलांच्या किमती वाढण्याची अपेक्षा आहे.

टॅग्स :व्यवसायइंडोनेशिया