Join us  

खाद्यतेल स्वस्त होणार! इंडोनेशियाचा पाम तेलावरील बंदी उठविण्याचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 7:34 PM

Indonesia to lift ban on palm oil exports from Monday : इंडोनेशिया हा जगातील सर्वात मोठा पाम तेल उत्पादक देश आहे.

भारतातील पाम तेलासह इतर खाद्यतेलाच्या किमतीत घट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, इंडोनेशियाने पामतेल निर्यातीवरील बंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे देशातील सर्वसामान्यांसाठी दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इंडोनेशियाने 23 मे पासून पाम तेलावरील बंदी उठवण्याची घोषणा केली आहे. इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांनी गुरुवारी ही घोषणा केली. इंडोनेशियाच्या खासदारांनी सरकारला निर्यात बंदीचा आढावा घेण्याचे आवाहन केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

मनीकंट्रोल डॉट कॉमने वृत्तसंस्था रॉयटर्सचा हवाला देत म्हटले आहे की, इंडोनेशियाच्या खासदारांनी सरकारला आवाहन करताना म्हटले होते की, पाम तेलावरील बंदी लवकर उठवली गेली नाही तर देशातील पाम तेलाचे उत्पादन ठप्प होऊ शकते. देशात पामतेल साठवण्यासाठी जागा शिल्लक नाही. त्यामुळे आता निर्यातबंदीचा फेरविचार व्हायला हवा,असे असे पाम उद्योगाचे म्हणणे आहे. 

विशेष म्हणजे, इंडोनेशिया हा जगातील सर्वात मोठा पाम तेल उत्पादक देश आहे. गेल्या महिन्यात 28 एप्रिलला इंडोनेशियाने देशातील वाढत्या किमती रोखण्यासाठी कच्चे पाम तेल आणि त्याच्या काही डेरिव्हेटिव्ह उत्पादनांच्या निर्यातीवर बंदी घातली. इंडोनेशियातून पामतेलाची निर्यात सुरू झाल्यानंतर या देशांमध्ये खाद्यतेलाच्या किमती पुन्हा एकदा खाली येण्याची शक्यता आहे.

इंडोनेशिया पाम तेलाचा जगातील सर्वात मोठा उत्पादक असून, भारताच्या वार्षिक गरजांपैकी 50 टक्के गरजा फक्त इंडोनेशिया पूर्ण करतो. भारतीय घरांमध्ये पाम तेल थेट स्वयंपाकात वापरले जात नाही परंतु त्याची उपस्थिती सर्वत्र आहे. खाद्यतेल ते सौंदर्य प्रसाधने, साबण, डिटर्जंट यासारख्या FMCG उत्पादनांमध्येही पाम तेलाचा वापर केला जातो.

टॅग्स :इंडोनेशियाव्यवसाय