Join us

इंडिगोची ३० विमाने लवकरच जमिनीवर, सुट्टीच्या हंगामात तिकीट दरवाढीची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2023 08:38 IST

आजच्या घडीला कंपनीच्या ताफ्यात एकूण ३३० विमाने आहेत. 

मुंबई : देशातील सर्वात मोठी विमान कंपनी असा लौकिक असलेल्या इंडिगो कंपनीच्या अडचणीत लवकरच वाढ होणार असून आगामी तीन महिन्यांच्या काळात कंपनीची जवळपास ३० विमाने इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे जमिनीवर स्थिरावण्याची चिन्हे आहेत. याच समस्येमुळे कंपनीची ५० विमाने यापूर्वीच देशातील विविध विमानतळांवर उभी आहेत. त्यात आता या नव्या ३० विमानांची भर पडल्यानंतर कंपनीची ८० विमाने जमिनीवरच असतील. परिणामी, आगामी काळातील सुट्ट्यांच्या मोसमात भारतीय अवकाशातून ८० विमाने कमी होणार असल्यामुळे विमान तिकिटांच्या किमती पुन्हा एकदा आणखी वाढताना दिसतील. आजच्या घडीला कंपनीच्या ताफ्यात एकूण ३३० विमाने आहेत. 

तांत्रिक दोषाचा फटकादेशातील बहुतांश विमानतळांवर कंपनीची सेवा सुरू आहे. तर परदेशातही काही ठिकाणी कंपनीची विमाने उड्डाण करतात. मे महिन्यात गो-फर्स्ट कंपनीच्या ताफ्यातील ५६ पैकी २५ विमाने इंजिनात बिघाड झाल्यामुळे जमिनीवर स्थिरावली होती. त्यानंतर विमानांची संख्या कमी झाल्यामुळे तिकीट दरात वाढ झाली होती. त्यात आता इंडिगोच्या विमानांची भर पडणार आहे. कंपनीच्या विमानांचे इंजिन हे प्रॅट अँड व्हिटनी या कंपनीचे आहे. या इंजिनमधील तांत्रिक दोषाचा फटका केवळ भारतीयच नव्हे तर जगातील अनेक विमान कंपन्यांना बसला आहे. 

टॅग्स :इंडिगो