Join us
Daily Top 2Weekly Top 5

भारताची नवी अर्थव्यवस्था, व्हेंचर कॅपिटलचे प्रमुखही चीनच्या नजरेखाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2020 02:31 IST

चीनच्या कंपनीने ज्या लोकांना लक्ष्य केले त्यात व्हेंचर कॅपिटालिस्ट, गुंतवणूकदार, देशातील आश्वासक स्टार्टअप्सचे संस्थापक आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्स आणि भारतात असलेले विदेशी गुंतवणूकदार यांचा समावेश आहे.

भारतीय रेल्वेत प्रशिक्षणार्थी असलेल्या अभियांत्रिकीचा विद्यार्थी याच्यापासून अझीम प्रेमजी यांनी उभारलेल्या व्हेंचर कॅपिटल कंपनीचे मुख्य गुंतवणूक अधिकारी यांच्यासह किमान १४०० एन्ट्रीजचा ओव्हरसीज की इंडिव्हिज्युअल डाटाबेस चीनने उभारलेल्या झेनहुआ डाटाकडे आहे. भारताच्या नव्या आर्थिक वर्णपटाला (स्पेक्ट्रम) या एन्ट्रीजने कवेत घेतलेले आहे.चीनच्या कंपनीने ज्या लोकांना लक्ष्य केले त्यात व्हेंचर कॅपिटालिस्ट, गुंतवणूकदार, देशातील आश्वासक स्टार्टअप्सचे संस्थापक आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्स आणि भारतात असलेले विदेशी गुंतवणूकदार यांचा समावेश आहे.भारतात ज्या दहा हजार लोकांवर व कंपन्यांवर चीनची कंपनी पाळत ठेवून आहे, त्यात या लोकांचा समावेश आहे व त्यांच्या डाटाबेसला तिने लक्ष्य केले आहे. विशेष म्हणजे भारतीय स्टार्टअप्समध्ये चीनची गुंतवणूक २०१६ मध्ये ३८१ दशलक्ष डॉलर्स होती ती २०१९ मध्ये ४.६ अब्ज डॉलर्स म्हणजे दहा पट वाढली. तथापि, भारत व चीन यांच्यात लडाखमध्ये सीमा प्रश्नावरून जो तणाव निर्माण झाला आहे, त्यामुळे अचानक वाढलेल्या गुंतवणुकीच्या भवितव्याबद्दल अनिश्चितता निर्माण झाली आहे.ओव्हरसीज की इंडिव्हिज्युअल डाटाबेसमध्ये ज्या प्रमुख लोकांना लक्ष्य केले जात आहे त्यात प्रेमजी इन्व्हेस्टमधील मुख्य गुंतवणूक अधिकारी टी. के. कुरियन (प्रेमजी इन्व्हेस्ट ही व्हेंचर कॅपिटल कंपनी अझीम प्रेमजी यांनी स्थापन केली आहे), महिंद्रा ग्रुपचे ग्रुप सीएफओ अनिश शाह, रिलायन्स बँ्रडस्चे सीटीओ पी. के. एक्स. थॉमस, रिलायन्स रिटेलचे मुख्य कार्यकारी ब्रायन बेड आणि मॉर्गन स्टॅनले, रियल इस्टेट इन्व्हेस्टिंगचे कंट्री हेड विनीत सेकसरिया यांचा समावेश आहे.याशिवाय फ्लिपकार्टचे सहसंस्थापक बिन्नी बन्सल, झोमॅटोचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दिपींदर गोयल, स्विगीचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नंदन रेड्डी, न्याकाचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी फाल्गुनी नायर, उबर इंडियाचे भारतातील प्रमुख पवन वैश आणि पेयू बिझनेस प्रमुख नमीत पोतनीस यांचाही त्यात समावेश आहे.

टॅग्स :व्यवसायचीन