मुंबईः आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं मोदी सरकारला दिलासा दिला आहे. भारतानं कॉर्पोरेट टॅक्स घटवण्याचा घेतलेला निर्णय योग्य असल्याचं आयएमएफनं म्हटलं आहे. भारताच्या या निर्णयामुळे परदेशी गुंतवणुकीला चालना मिळणार आहे. तसेच घरगुती कंपन्याही गुंतवणुकीसाठी पुढे येणार आहे. आयएमएफचे संचालक (आशिया आणि पॅसिफिक विभाग) चेंगयाँग री म्हणाले, सध्याच्या आर्थिक वर्षातील भारताचा विकासदर 6.1 टक्के राहील, पण तोच विकासदर 2020पर्यंत 7 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. बँकांच्या स्थितीत लवकरात लवकर सुधार होण्याची गरज असून, भारताला वित्तीय एकीकरणाची गरज असल्याचंही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं म्हटलं आहे. आयएमएफचे उपसंचालक (आशिया आणि पॅसिफिक विभाग) एन्ने-मॅरी गुल्डे-वॉफ म्हणाले की, भारताला नॉन बँकिंग फायनान्शियल सेक्टरमधल्या समस्या लवकरात लवकर सोडवाव्या लागणार आहेत. 2019-20मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा 6.1 टक्के राहील, असा अंदाज वर्तवला होता. त्या तुलनेत 2020 मध्ये भारताच्या विकासदरात वाढ होईल, असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं म्हटलं आहे. 2020मध्ये भारतीय अर्थव्यवस्था 7 टक्क्यानं वाढेल, अशी शक्यता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं वर्तवली आहे. यंदाच्या वर्षी जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर केवळ 3 टक्के असेल, असा अंदाज संस्थेनं व्यक्त केला आहे. गेल्या वर्षी जगाची अर्थव्यवस्था 3.8 टक्क्यानं वाढली होती.
पुढच्या वर्षी भारताचा विकासदर 7 टक्के शक्य, IMFचा मोदी सरकारला दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2019 13:01 IST