Join us

ट्रम्प टॅरिफच्या संकटातही भारताची आर्थिक गाडी सुस्साट! GDP च्या वाढीत चीनलाही टाकलं मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 17:25 IST

India's Q1 FY26 GDP : डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ दादागिरीनंतरही भारताने देशांतर्गत दमदार कामगिरी केली आहे. पहिल्या तिमाहीत देशाचा जीडीपी ६.७ टक्के राहण्याचा अंदाज होता.

India's GDP Growth : सध्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प टॅरिफच्या माध्यमातून भारताची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहेत. याचा परिणाम शेअर बाजारावर दिसत असून गेल्या काही महिन्यांपासून बाजारात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. मात्र, टॅरिफच्या तणावामुळे जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण असतानाही, देशांतर्गत आघाडीवर भारताने दमदार कामगिरी केली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाचा जीडीपी (सकल देशांतर्गत उत्पादन) ७.८ टक्क्यांच्या दराने वाढला आहे, जो अपेक्षेपेक्षा खूप जास्त आहे.

या तिमाहीत जीडीपी ६.७ टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता, तर गेल्या आर्थिक वर्षात जीडीपी वाढ ६.५ टक्के होती. आता या तिमाहीत जीडीपीची वाढ ७.८ टक्के झाल्यामुळे भारताने जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून आपले स्थान कायम राखले आहे, कारण याच काळात चीनची जीडीपी वाढ केवळ ५.२ टक्के राहिली आहे. 

वाढीचे कारण काय?भारतीय अर्थव्यवस्थेच्या या शानदार सुरुवातीमागे सरकारी खर्चातील जबरदस्त वाढ आणि सेवा क्षेत्रातील वेगवान प्रगती असल्याचे सांगितले जात आहे. शुक्रवारी जारी झालेल्या सरकारी आकडेवारीनुसार, प्रामुख्याने कृषी क्षेत्राच्या उत्तम कामगिरीमुळे जीडीपी वाढीचा दर वाढला आहे.

या आकडेवारीनुसार, कृषी क्षेत्राने ३.७ टक्के वाढ नोंदवली, जी मागील वर्षी याच तिमाहीत १.५ टक्के होती. आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या पहिल्या तिमाहीत उत्पादन क्षेत्राचा वाढीचा दर किंचित वाढून ७.७ टक्के झाला आहे, तर एका वर्षापूर्वी तो ७.६ टक्के होता.

वाचा - पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५ वर्षांत मिळवा ५ लाख रुपये व्याज! मुलांच्या नावावरही करू शकता गुंतवणूक

सरकारला मोठा दिलासाज्या प्रकारे ट्रम्प प्रशासनाने भारतावर ५० टक्के इतका मोठा टॅरिफ लावला आहे आणि एक नवीन आव्हान निर्माण केले आहे, अशा परिस्थितीत आर्थिक आघाडीवरील ही आकडेवारी सरकारला मोठा दिलासा देणारी आहे. तसेच, हे आकडे टॅरिफच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी आणि इतर पर्यायांवर लवकर पावले उचलण्यासाठी सरकारला प्रोत्साहित करतील. 

टॅग्स :अर्थव्यवस्थाटॅरिफ युद्धडोनाल्ड ट्रम्पअमेरिका