Join us  

अर्थव्यवस्थेसमोरील चिंता वाढली; दुसऱ्या तिमाहीत जीडीपीमध्ये मोठी घसरण होण्याचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 11:27 AM

उद्योगजगतात असलेल्या सुस्तीच्या वातावरणामुळे देशाच्या आर्थिक आघाडीवरील चिंता आधीच वाढलेली आहे. त्यात आता येणारा काळ हा भारतीय अर्थव्यवस्थेसाठी अधिकच खडतर असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 नवी दिल्ली -  उद्योगजगतात असलेल्या सुस्तीच्या वातावरणामुळे देशाच्या आर्थिक आघाडीवरील चिंता आधीच वाढलेली आहे. त्यात आता येणारा काळ हा भारतीय अर्थव्यवस्थेसाठी अधिकच खडतर असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सरकारकडून अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे प्रयत्न सुरू असले तरी येत्या काळात जीडीपीच्या आकडेवारीत देसाला मोठा धक्का बसण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. औद्योगिक उप्तादनात अपेक्षेपेक्षा घट झाल्याने चालू आर्थिक वर्षात जीडीपीमधील वाढ घटून पाच टक्क्यांपर्यंत येण्याचा अंदाज देशातील आघाडीच्या बँकांनी वर्तवला आहे. 2019 च्या आर्थिक वर्षात जीपीडी वाढीचा दर हा 6.8 टक्के इतका होता.  समोर आलेल्या आकडेवारीनुसार जुलै ते सप्टेंबर या जुसऱ्या तिमाहीत जीडीपीची वाढ घटून 4.2 टक्के इतकीच राहण्याची शक्यता आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जीडीपीमध्ये केवळ 5 टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली होती. जीडीपीच्या वाढीत सातत्याने होत असलेल्या घटीमुळे सरकारवर अर्थव्यवस्थेचा डोलारा सावरण्यासाठी अधिक प्रयत्न करण्यासाठी दबाव वाढू शकतो. दरम्यान, दुसऱ्या तिमाहीतील जीडीपीची अधिकृत आकडेवारी 29 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे. तर संपूर्ण वर्षासाठीचा जीडीपीचा अंदाज जानेवारी महिन्यात प्रसिद्ध होईल.  दरम्यान, चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत देशाच्या जीडीपीमधील वाढ 4.2 टक्के राहील. असा अंदाज स्टेट बँक ऑफ इंडियाच्या इकॉनॉमिक रिसर्च डिपार्टमेंटच्या मासिक अहवालात वर्तवण्यात आला आहे. दुसऱ्या तिमाहीत ऑटोमोबाइल विभागात कमी झालेली विक्री, हवाई वाहतुकीला मिळत असलेला थंडा प्रतिसाद तसेच बांधकाम आणि निर्मिती क्षेत्रातील घटत्या गुंतवणुकीमुळे जीडीपीत घट होईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. एसबीआयच्या या अहवालात  संपूर्ण आर्थिक वर्षात जीडीपीमधील वाढ ही पाच टक्के राहील असे म्हटले आहे.   

टॅग्स :अर्थव्यवस्थाभारत