Join us  

जागतिक बँकेच्या उद्योगस्नेही देशांच्या क्रमवारीत भारताची मोठी झेप, पटकावले 100 वे स्थान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2017 9:18 PM

जागतिक बँकेने जाहीर केलेल्या व्यावसायिक सोईसुविधांसाठी अनुकूल देशांच्या क्रमवारीत भारताने मोठी झेप घेतली आहे.

नवी दिल्ली -  गेल्या काही काळात मोदी सरकारने आर्थिक आघाडीवर घेतलेल्या काही कडू निर्णयांचे चांगले परिणाम आता दिसू लागले आहेत. मंगळवारी जागतिक बँकेने जाहीर केलेल्या व्यावसायिक सोईसुविधांसाठी अनुकूल असलेल्या उद्योगस्नेही देशांच्या क्रमवारीत भारताने मोठी झेप घेतली आहे. गेल्यावर्षी 130 व्या क्रमांकावर असलेल्या भारताने 30 स्थानांनी प्रगती करत 100 वे स्थान पटकावले आहे. वित्तमंत्री अरुण जेटली यांनी पत्रकार परिषद घेत याची माहिती दिली. तसेच जागतिक बँकेने भारताच्या कामगिरीचे कौतुक केल्याचे सांगितले. 

एकूण 190 देशांच्या क्रमवारीत भारत गेल्यावर्षी 130 व्या स्थानी होता. गेल्या वर्षात व्यापक प्रमाणावर करण्यात आलेल्या आर्थिक सुधारणांनंतर या क्रमवारीत फायदा होण्याची अपेक्षा सरकारला होता. त्या अपेक्षेप्रमाणे जागतिक बँकेच्या क्रमवारीत सुधारणा दिसून आली आहे. 

चांगली कामगिरी करणाऱ्या 10 देशांमध्ये भारताचा समावेश आहे. तसेच विविध क्षेत्रातील भारताच्या कामगिरीची  वित्तमंत्री अरुण जेटली यांनी माहिती दिली. जेटली म्हणाले,"छोट्या भागधारकांच्या क्रमवारीत भारत चौथ्या स्थानी पोहोचला आहे. व्यवसायांसाठी पतपुरवठा करण्याच्याबाबतीत देशाला 29 वे स्था मिळाले आहे. तसेच व्यवसायांना वीजपुरवठा करण्याच्याबाबतीतही भारताने 29 वे स्थान पटकावले आहे. तर करभरणा करणाऱ्यांच्या यादीत भारताला 119 वे स्थान मिळाले आहे. 

जेटली पुढे म्हणाले, "अनेक बाबतीत आम्ही आपल्या स्थितीत सुधारणा केली आहे. करभरणा करणाऱ्यांच्या यादीत भारत 172 व्या स्थानी होता. आत करसुधारणा करून आम्ही करभरणा करणाऱ्यांच्या यादीत 53 स्थानांनी प्रगती केली आहे. बांधकाम परवान्यांच्या बाबतीत आम्ही 181 व्या स्थानी आहोत. त्यात आम्ही आठ स्थानांची प्रगती केली आहे. तसेच इतर अनेक सुधारणांचा फायदा पुढच्या काही वर्षांमध्ये दिसून येणार आहे."

 

टॅग्स :भारतअरूण जेटली