Join us
Daily Top 2Weekly Top 5

डॉलरपुढे रुपयाची ऐतिहासिक लोळण; आयातीसाठी मोजावे लागणार अधिक पैसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 10:53 IST

गाठला ९१.६४चा नीचांक; जागतिक तणाव अन् विदेशी गुंतवणूकदारांनी पाठ फिरवल्याने बाजार चिंतेत

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: जागतिक अनिश्चितता, परदेशी गुंतवणूकदारांकडून सततची विक्री आणि वाढत्या भू-राजकीय तणावाचा मोठा फटका भारतीय चलनाला बसत आहे. बुधवारी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया तब्बल ६७ पैशांनी कोसळून ९१.६४ या ऐतिहासिक नीचांकावर बंद झाला. रुपयाच्या मूल्याने आजवरची ही सर्वांत नीचांकी पातळी गाठल्याने देशांतर्गत बाजारपेठेत चिंतेचे वातावरण आहे. याचा थेट फटका सामान्य नागरिकांना बसणार असून, आयात महाग झाल्याने महागाई वाढणार आहे.

आंतरबँक परकीय चलन बाजारात रुपया ९१.०५ वर उघडला आणि व्यवहारादरम्यान तो ९१.७४ पर्यंत खाली गेला होता. शेवटी, मागील बंदच्या तुलनेत ६७ पैशांची घसरण नोंदवत तो ९१.६४ या ऐतिहासिक नीचांकावर स्थिरावला. २१ नोव्हेंबर २०२५ नंतरची ही एका दिवसातील सर्वांत मोठी घसरण असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

नेमकी घसरण का झाली? काय आहेत तीन कारणे?

  • ग्रीनलँड वाद, युरोप तणाव : ग्रीनलँडच्या मुद्द्यावरून युरोपमध्ये निर्माण झालेला तणाव  आणि अमेरिकेसोबतच्या टॅरिफच्या भीतीमुळे गुंतवणूकदार सावध झाले आहेत.
  • भांडवलाचा ओघ आटला : परदेशी  गुंतवणूकदारांनी (एफआयआय) भारतीय शेअर बाजारातून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक काढून घेण्याचा सपाटा लावला आहे.
  • कच्च्या तेलातील चढ-उतार : व्हेनेझुएलाच्या तेल साठ्यांवरून निर्माण झालेला पेच आणि जागतिक व्यापारातील अडथळ्यांचा परिणाम रुपयावर होत आहे.

तब्बल ३ लाख कोटी बुडाले

  • शेअर बाजारात  तिसऱ्या दिवशी मोठी घसरण पाहायला मिळाली.
  • मुंबई शेअर बाजाराचा ‘सेन्सेक्स’ २७०.८४ अंकांनी घसरून ८१,९०९ वर बंद झाला.
  • सत्रादरम्यान सेन्सेक्स १ अंकांपेक्षा खाली कोसळला.
  • निफ्टीमध्येही ७५ अंकांची घट होऊन तो २५,१५७ वर स्थिरावला.
  • गुंतवणूकदारांचे तीन लाख कोटी रुपये बुडाले.
English
हिंदी सारांश
Web Title : Rupee Plummets to Record Low Against Dollar; Import Costs Rise

Web Summary : The rupee hit a historic low of 91.64 against the dollar due to global uncertainty and foreign investor selling. This depreciation will likely increase import costs, fueling inflation and impacting the common man. The Sensex also fell, causing investors to lose three lakh crore.
टॅग्स :भारतीय चलन