Join us  

वर्षभरात रेल्वेची रेकॉर्डब्रेक कमाई, रेल्वेमंत्री अश्‍व‍िनी वैष्‍णव यांनी मांडली आकडेवारी...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2024 4:18 PM

Ashwani Vaishnav: वर्षभरात 5300 किमी नवीन ट्रॅक टाकले, तर 551 नवीन डिजिटल स्टेशन सुरू करण्यात आले.

Indian Railways Revenue: भारतात आजही लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी भारतीय रेल्वेला सर्वाधिक पसंती दिली जाते. दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. याद्वारे सरकारला मोठा महसूल मिळतो. यंदाही रेल्वेने प्रचंड महसूल मिळवला आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2023-24 या आर्थिक वर्षात रेल्वेने 2.56 लाख कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे. ही आतापर्यंतची विक्रमी पातळी आहे. वर्षभरापूर्वी हा आकडा 2.40 लाख कोटी रुपये होता. 

5300 किमीचा ट्रॅक तयाररेल्वेमंत्र्यांनी X (पूर्वीचे ट्विटर) वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, भारतीय रेल्वेने FY 24 मध्ये 1591 मिलियन टन मालवाहतूक केली. तसेच, 5300 किमीचा नवीन ट्रॅकही टाकण्यात आला आहे. याशिवाय, वर्षभरात 551 डिजिटल स्टेशन सुरू करण्यात आले. अंतरिम अर्थसंकल्पानुसार, रेल्वेला 2024-25, या आर्थिक वर्षात 2.52 लाख कोटी रुपयांचा भांडवली खर्च प्राप्त होईल, जो एका वर्षापूर्वी वाटप केलेल्या 2.4 लाख कोटी रुपयांपेक्षा 5 टक्के अधिक आहे. 

सवलती बंद केल्याचा फायदा यापूर्वी एका आरटीआयमध्ये असे समोर आले आहे की, ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वे तिकिटावरील सवलत बंद केल्याने रेल्वेला फायदा झाला आहे. कोरोनापूर्वी रेल्वे तिकीट खरेदी करताना ज्येष्ठ नागरिकांना सवलत मिळायची. कोरोनानंतर ही सवलत बंद करण्यात आली. ही सवलत रद्द केल्यामुळे रेल्वेला सुमारे 5800 कोटी रुपयांचा फायदा झाला. पूर्वी रेल्वे महिलांना भाड्यात 50 टक्के आणि ट्रान्सजेंडर श्रेणीतील पुरुष आणि ज्येष्ठ नागरिकांना 40 टक्के सवलत देत असे. ही सूट रद्द केल्यानंतर सर्वांना एकसमान भाडे द्यावे लागते.

टॅग्स :भारतीय रेल्वेरेल्वेअश्विनी वैष्णवकेंद्र सरकार