इराणकडून पेट्रोलिअम पदार्थांची खरेदी केल्यावरून अमेरिकेने सहा भारतीय कंपन्यांवर निर्बंध लादले आहेत. तसेच रशियाकडून कच्चे तेल खरेदी केले तर १०० टक्के टेरिफ लावण्याची धमकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. यामुळे इंडियन ऑईल, हिंदुस्तान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम आणि मंगळुरू रिफायनरींनी सावध पवित्रा घेतला असून गेल्या आठवड्यापासूनच रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणे थांबविले आहे.
२०२२ पासून या तेल कंपन्या रशियाकडून सवलतीतील कच्चे तेल खरेदी करत आहेत. यामुळे या कंपन्यांना बक्कळ फायदा होत आहे. भारतातील इंधनाचे दर काही उतरलेले नाहीत, परंतू रिफायनरी कंपन्या आणि सरकारचे हात मात्र तुपात आहेत. अशा परिस्थितीत अमेरिका रशियाने युक्रेनरील हल्ले थांबवावेत म्हणून भारतावर कच्चे तेल खरेदी न करण्याचा दबाव टाकत आहे. या चारही सरकारी कंपन्यांनी रशियाकडून तेल खरेदी थांबविली असून मध्य पूर्वेकडील देश आणि आफ्रिकेकडून तेल खरेदी सुरु केली आहे, असे सुत्रांनी म्हटले आहे. याबाबतचे वृत्त आजतकने दिले आहे.
भारतातील या सरकारी कंपन्यांनी गेल्या आठवड्यापासून कच्चे तेल आयात केलेले नाही. यावर विचारलेल्या प्रश्नांना या कंपन्यांनी कोणतेही उत्तर दिलेले नाही. सरकारी कंपन्यांनी एकीकडे रशियाकडून तेल मागविणे थांबविले असले तरी रिलायन्स आणि नायरा या खासगी कंपन्यांनी मात्र आयात सुरुच ठेवली आहे. सध्या रशियानेही कच्च्या तेलाचे दर वाढविले आहेत. ट्रम्प यांनी रशियाकडून कच्चे तेल खरेदी केल्याबद्दल भारतावर १०० टक्के कर लादण्याची धमकी दिली होती. ट्रम्प यांनी ९० हून अधिक देशांवर परस्पर कर लादण्याची घोषणा केली आहे. १ ऑगस्टपासून भारतावर २५ टक्के कर लादण्यात आला आहे. आता रशियाकडून कच्चे तेल खरेदी केले तर ट्रम्प भारतावर दंडही आकारण्याची शक्यता आहे.