Join us  

भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा धक्का, कॉम्पिटिटिव्ह इकॉनॉमीच्या क्रमवारीत दहा स्थानांनी घसरण  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2019 8:30 AM

एकीकडे देशातील अर्थव्यवस्था गंभीर मंदीचा सामना करत असतानाच आर्थिक आघाडीवरून भारताची चिंता वाढवणारी अजून एक बातमी आली आहे.

नवी दिल्ली - एकीकडे देशातील अर्थव्यवस्था गंभीर मंदीचा सामना करत असतानाच आर्थिक आघाडीवरून भारताची चिंता वाढवणारी अजून एक बातमी आली आहे. जगातील कॉम्पिटिटिव्ह इकॉनॉमी अर्थात स्पर्धात्मक अर्थव्यवस्थांच्या क्रमवारीत भारताची 10 स्थानांनी घसरण झाली आहे. आता या क्रमवारीत भारतीय अर्थव्यवस्था 68 व्या स्थानावर आहे. या क्रमवारीत झालेल्या घसरणीमुळे अर्थव्यवस्थेला मंदीच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे.  वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने प्रसिद्ध केलेल्या या नव्या क्रमवारीपूर्वी ग्लोबल कॉम्पिटिटिव्ह इंडेक्समध्ये (जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक) भारत 58 व्या स्थानावर होता. मात्र यावर्षी भारत हा ब्राझीलसह ब्रिक्स देशांमध्ये सर्वात खराब कामगिरी करणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक देश ठरला. या क्रमवारीत ब्राझीलला 71 वे स्थान देण्यात आले आहे.  दरम्यान, या क्रमवारीतील अव्वलस्थान अमेरिकेने गमावले असून, सिंगापूरने अव्वलस्थानी झेप घेतली आहे. चीनसोबत सुरू असलेल्या व्यापारी युद्धाचा फटका अमेरिकी अर्थव्यवस्थेला बसला आहे.   वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने ही क्रमवारी प्रसिद्ध करताना सांगितले की, आर्थिक स्थिरतेच्या बाबती भारत अजून उत्तम स्थितीत आहे. तसेच या देशाचे आर्थिक क्षेत्र खूप विस्तृत आहे. मात्र बॅड लोनशी झुंजत असलेले बँकिंग क्षेत्र ही अर्थव्यवस्थेसाठी चिंतेची बाब आहे.  कॉर्पोरेट गव्हर्नन्स क्रमवारीत भारत 15 व्या स्थानीकॉम्पिटिटिव इकॉनॉमीच्या क्रमवारीत घसरण झाली असतील तरी कॉर्पोरेट गव्हर्नंसच्या बाबत वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने भारताला 15 वे स्थान दिले आहे. शेअरहोल्डर गव्हर्नंसच्या बाबतीत भारताला दुसरे स्थान देण्यात आले आहे. तसेच मार्केट साइजच्या क्रमवारीत भारताला तिसरे स्थान देण्यात आले आहे. अक्षय उर्जेच्या बाबतीतही भारताला तिसरे स्थान देण्या आले आहे. तसेच बाजारातील नाविन्याच्या बाबतीतही भारतीय अर्थव्यवस्थेला अनेक विकसित होत असलेल्या अर्थव्यवस्थांपेक्षा वरचे स्थान देण्यात आले आहे.  आयुर्मानाच्या क्रमवारीत 109 व्या स्थानावर मात्र देशातील आयुर्मानाच्या क्रमवारीत भारत असूनही तळाच्या देशांमध्ये आहे. एकूण 141 देशांचा समावेश असलेल्या क्रमवारीत भारताला 109 वे स्थान देण्यात आले आहे. आफ्रिका खंडाबाहेरच्या देशांचा विचार केल्यास ही स्थिती फार चांगली म्हणता येणार नाही. तसेच दक्षिण आशियाई देशांशी तुलना केल्याससुद्धा भारताचे स्थान खूप खाली आहे.  

टॅग्स :अर्थव्यवस्थाभारत