Join us

व्यापार संकटांचा भारताला धोका नाही; अर्थव्यवस्था, बँकिंग मजबूत स्थितीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 14:45 IST

‘मूडीज रेटिंग्स’कडून कौतुक, अमेरिकी टॅरिफचा पायाभूत सुविधा क्षेत्रावर परिणाम नाही

नवी दिल्ली : जागतिक व्यापारात विविध आव्हानांची भर पडत असताना ‘मूडीज रेटिंग्स’च्या बुधवारी जाहीर केलेल्या अहवालात भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत सकारात्मक टिप्पणी केली आहे. अमेरिकेचे टॅरिफ व जागतिक व्यापार अडथळ्यांच्या नकारात्मक परिणामांचा सामना करण्यासाठी भारत सुस्थितीत आहे.‘मूडीज’च्या म्हणण्यानुसार, मोठी अर्थव्यवस्था व निर्यातीवर असलेले कमी अवलंबित्व यामुळे देशाची स्थिती मजबूत आहे. जर व्यापार चर्चा यशस्वी झाली आणि इतर बाजारांपेक्षा भारतावर टॅरिफ कमी झाले तर अमेरिकी बाजारात भारतात बनवलेल्या वस्तूंना मागणी वाढू शकते आणि यामुळे भारताला फायदा होईल. अमेरिकी टॅरिफचा प्रभाव बहुतांश पायाभूत सुविधा क्षेत्रावर कमी असेल.

बँकिंग व्यवस्था स्थिर आणि मजबूत‘मूडीज’ने म्हटले की, जागतिक अस्थिरतेनंतरही भारताची मजबूत बँकिंग बाजारपेठ आणि स्थिर कर्ज व्यवस्था आर्थिक मजबुतीचे निदर्शक आहेत. तरीही, जागतिक स्तरावरील घसरणीचा परिणाम होऊ शकतो. 

या पार्श्वभूमीवर महागाईमध्ये घट झाल्यामुळे भारतात व्याजदर कपात होण्याची शक्यता आहे. यामुळे अर्थव्यवस्थेला अधिक पाठबळ मिळेल. यासोबतच बँकिंग क्षेत्रातील सुलभ प्रक्रिया असल्यामुळे कर्ज देणे सोपे होईल.

वृद्धिदर जी-२० देशांत सर्वाधिकरेटिंग एजन्सीने म्हटले की, सर्व देशांवर अमेरिकेचे १० टक्के टॅरिफ व बहुतेक चिनी वस्तूंवर ३०% टॅरिफमुळे जागतिक अर्थकारणात अनेक अडथळे निर्माण येतील. यामुळे २०२५ मध्ये आर्थिक वाढ ६.७% वरून ६.३% पर्यंत घसरू शकते. 

तरीही वाढीचा दर जी-२० देशांत सर्वाधिक असेल. सरकारचे खप वाढवण्याचे प्रयत्न, उद्योगांच्या क्षमतावाढीसाठी हालचाली व पायाभूत सुविधांवर वाढलेला खर्च यामुळे जागतिक मागणीत घट झाला तरी फार नुकसान होणार नाही. 

बँकांना गैर-व्याज उत्पन्नाचा लाभ‘मूडीज’ने म्हटले की, भारतातील बँकांच्या गैर-व्याज उत्पन्नात वाढ होईल. यामध्ये मोठे व्यावसायिक व्यवहार, संपत्ती व्यवस्थापन आणि विमा सेवा यातून फायदा मिळेल. एकूणच, आम्हाला अपेक्षा आहे की प्रणालीतील परतावा आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या पहिल्या सहामाहीत १.४०% वरून २०२६ मध्ये १.२५% च्या मर्यादेपर्यंत घसरेल. सीमेवरील मागील काही दिवसात तणाव वाढला आहे. यामुळे भारताच्या तुलनेत पाकिस्तानच्या विकासावर जास्त दबाव येईल.  

टॅग्स :व्यवसाय