Nepal protest : भारताचे शेजारी राष्ट्र नेपाळमध्ये सध्या अस्थिर परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकारविरोधात लोक रस्त्यावर उतरले आहेत. ठिकठिकाणी आंदोलन आणि जाळपोळ सुरू आहे. नेपाळमधील परिस्थितीवरुन भारतात चिंतेचे वातावरण आहे. कारण, नेपाळ हा फक्त भारताचा शेजारी नाही तर एक व्यापारी भागिदारही आहे. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार ८ अब्ज डॉलरहून अधिक आहे. यात भारताचा व्यापार अधिशेष ५४ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. जवळपास १० वर्षांपूर्वी नेपाळ भारताचा २८ वा सर्वात मोठा व्यापारी भागीदार होता, आता तो १४ व्या क्रमांकावर पोहोचला आहे.
राजकीय पार्श्वभूमी आणि भारताचा दृष्टिकोननेपाळमध्ये केपी शर्मा ओली यांचे सरकार सत्तेत आल्यापासून भारत आणि नेपाळचे राजकीय व धोरणात्मक संबंध फारसे चांगले राहिलेले नाहीत. नेपाळ चीनच्या जवळ येत असल्याचेही दिसत आहे. सध्या नेपाळचे तरुण विविध मुद्द्यांवरून सरकारविरोधात आंदोलन करत आहेत, ज्यात सोशल मीडिया ॲपवर बंदी आणि भ्रष्टाचार हे प्रमुख मुद्दे आहेत. भारताला लागून असलेल्या नेपाळच्या सीमेमुळे आणि मजबूत व्यापारी संबंधांमुळे भारत या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहे.
गेल्या ५ वर्षांतील व्यापार स्थितीगेल्या ५ वर्षांत भारत आणि नेपाळ यांच्यातील व्यापारामध्ये चढ-उतार दिसून आले आहेत. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये दोन्ही देशांमध्ये ८.५ अब्ज डॉलरहून अधिकचा व्यापार झाला. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, या वर्षात भारताने नेपाळला सुमारे ६५ हजार कोटी रुपयांची (७३३४.८७ दशलक्ष डॉलर) निर्यात केली, तर नेपाळकडून सुमारे १० हजार कोटी रुपयांची (१२०१.४८ दशलक्ष डॉलर) आयात केली. याचाच अर्थ, भारताला नेपाळशी व्यवसाय करताना मोठा फायदा होत आहे.
भारत आणि नेपाळमधील ५ वर्षांचा व्यापार (दशलक्ष डॉलरमध्ये)
वर्ष | भारताची नेपाळला निर्यात | भारताची नेपाळकडून आयात | एकूण व्यापार |
२०२१ | ६,८३८.४६ | ६७३.१६ | ७,५११.६२ |
२०२२ | ९,६४५.७४ | १,३७१.०४ | ११,०१६.७९ |
२०२३ | ८,०१५.९९ | ८३९.६२ | ८,८५५.६१ |
२०२४ | ७,०४०.९८ | ८३१.११ | ७,८७२.०९ |
२०२५ | ७,३३४.८७ | १,२०१.४८ | ८,५३६.३५ |
आर्थिक वर्ष २०२२ मध्ये दोन्ही देशांतील एकूण व्यापार ११ अब्ज डॉलरच्या विक्रमी पातळीवर पोहोचला होता. त्यानंतर दोन वर्षे त्यात घट झाली, पण २०२५ मध्ये पुन्हा एकदा व्यापार वाढलेला दिसतो.
भारत नेपाळला कोणत्या वस्तूंची निर्यात करतो?नेपाळ अनेक वस्तूंसाठी भारतावर अवलंबून आहे. शेजारील देश असल्याने भारत नेपाळला पेट्रोलियम उत्पादने, लोह, स्टील, ऑटो पार्ट्स आणि औषधे यांचा मोठ्या प्रमाणात पुरवठा करतो. सरकारी पेट्रोलियम कंपनी आयओसीएलचा नेपाळमध्ये मोठा व्यवसाय असून, तेथे तेल वितरणाचे कामही ही कंपनी करते. याशिवाय, भारत नेपाळला सवलतीच्या दरात वीजही पुरवतो.
वाचा - डिफेन्स कंपनीचा शेअर ठरला 'मल्टीबॅगर', ६ महिन्यांत पैसे दुप्पट; ५ वर्षांत दिला २०००% परतावा
नेपाळकडून भारतात कोणती आयात होते?नेपाळमधून भारतात काही महत्त्वाच्या वस्तूंची आयात केली जाते. यात ज्यूट उत्पादने, चहा, कॉफी आणि मसाल्यांचा समावेश आहे. याशिवाय फायबर, लाकडी सामान, वनस्पती तेल, कापड, मीठ आणि दगड यांसारख्या वस्तूंचीही मोठ्या प्रमाणात आयात होते.