Join us

इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 08:25 IST

कार्यक्रमात लावण्यात आलेल्या स्टॉल्सना अनेक मंत्र्यांनीही भेटी दिल्या

लोकमत न्यूज नेटवर्क, उरण: जेएनपीएने इंडिया मेरिटाईम वीक-२०२५ मध्ये जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी दोन लाख २८ हजार ३०० कोटींचे सामंजस्य करार केले आहेत. यापैकी बहुतांश सामंजस्य करार हे वाढवण बंदराच्या विकासामध्ये भागीदारीचे आहेत. यावेळी जेएनपीएने ‘भागीदारीद्वारे समृद्धी’ हा किताबही पटकाविला आहे.गोरेगाव-मुंबई येथील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे २७ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान आयोजित इंडिया मेरिटाईम वीक-२०२५ मध्ये जेएनपीएने जोरदार उपस्थिती दर्शविली होती. यादरम्यान जेएनपीएने भारतातील व जागतिक पातळीवर विविध कंपन्यांशी दोन लाख २८ हजार ३०० कोटींचे सामंजस्य करार केले आहेत. 

‘इंडिया मेरिटाइम वीक-२०२५’मध्ये गुंतवणूक

अदानी पोर्ट्स ॲंड स्पेशल इकॉनॉमिक झोन (२६,५०० कोटी), अदानी पोर्ट्स आणि जेएनपीए एपीएसईझेड , वाढवण कंटेनर टर्मिनल्सच्या (२५,००० कोटी), इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन (२०,००० कोटी), एव्हरग्रीन मरीन प्रा.लिमिटेड (१०,००० कोटी), हाऊसींग ॲण्ड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (५,००० कोटी), ड्रेजिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (१,५०० कोटी), गल्फटेनर कंपनी लि. (४,००० कोटी), इंडियन पोर्ट रेल अँड रोपवे कॉर्पोरेशन लिमिटेड (३०० कोटी), बोस्कॅलिस इंटरनॅशनल बी.व्ही. (२६५००कोटी), एजिस लॉजिस्टिक्स लिमिटेड (२०,००० कोटी), भिलोसा इंडस्ट्रीज लिमिटेड (१५,००० कोटी),  एनएमडीसी (६,५०० कोटी), अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लि. (६,५००), एनसीसी लि. (२६,५०० ), वान हाय लाईन्स (२०,००० कोटी), हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन (६,५०० कोटी), सविता ऑइल टेक्नॉलॉजीज लि. (१,५०० ), सेम इंडिया प्रोजेक्ट लिमिटेड ( ६,५०० ), कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. (५००) यांनी गुंतवणूक केली आहे.

मंत्र्यांची स्टाॅलला भेट

जेएनपीएने लावलेल्या बिझनेस स्टॉलला केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल आणि बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाचे सचिव विजय कुमार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, मंत्री जयकुमार रावल, जागतिक पातळीवर विविध कंपन्यांचे प्रतिनिधींनीही जेएनपीए स्टॉलला भेट दिली.

जेएनपीएला सुरू असलेले विविध प्रकल्पांसाठी धोरणात्मक दृष्टिकोन आणि भारताच्या सागरी विकासाच्या पुढील टप्प्याला आकार देणाऱ्या सहकार्याचे प्रदर्शन करण्यासाठी एक उत्कृष्ट व्यासपीठ प्रदान केले असल्याचे जेएनपीएचे अध्यक्ष गौरव दयाल यांनी सांगितले.

टॅग्स :गुंतवणूक