Join us  

१ लाखाचा लॅपटॉप ४०,००० रुपयांत मिळण्याचं स्वप्न अधुरं राहणार? 'या' ड्रीम प्रोजेक्टवर ओढावलं संकट!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2023 3:38 PM

सध्या बाजारात जो १ लाख रुपये किमतीला मिळणारा लॅपटॉप आहे तो जर तुम्हाला ४० हजार रुपयांत मिळाला तर? विचार करा किती पैसे वाचतील.

सध्या बाजारात जो १ लाख रुपये किमतीला मिळणारा लॅपटॉप आहे तो जर तुम्हाला ४० हजार रुपयांत मिळाला तर? विचार करा किती पैसे वाचतील. वेदांता ग्रूपचे मालक आणि अब्जाधीश उद्योगपती अनिल अग्रवाल यांनी जवळपास १० वर्षांपूर्वी हे स्वप्न सत्यात उतरवण्याचं ठरवलं होतं. पण आता त्यांच्या याच ड्रीम प्रोजेक्टवर संकटाचे ढग जमा झाले आहेत. 

वेदांता ग्रुपच्या वेदांत रिसोर्सेस लिमिटेडने तैवानच्या हॉन हाय प्रिसिजन इंडस्ट्री कंपनी (फॉक्सकॉन) च्या सहकार्यानं भारतात सेमीकंडक्टर प्लांट उभारण्याची घोषणा केली होती. सुमारे १९ अब्ज डॉलर गुंतवणुकीचा हा देशातील पहिला सेमीकंडक्टर प्लांट गुजरातमध्ये उभारला जाणार आहे. अनिल अग्रवाल यांच्या या ड्रीम प्रोजेक्टसाठी कंपनीला आता टेक्नॉलॉजी पार्टनरपासून फंडिंगपर्यंतच्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्याचबरोबर सरकारकडून त्यांना अपेक्षित असलेल्या आर्थिक मदतीबाबतही परिस्थिती स्पष्ट झालेली नाही.

सुमारे ७ महिन्यांपूर्वी वेदांत रिसोर्सेसने होन है यांच्या भागीदारीत सेमीकंडक्टर प्लांट उभारण्याची घोषणा केली होती. परंतु यासाठी तयार केलेला उपक्रम अद्याप फॅब्रिकेशन युनिट ऑपरेटर किंवा परवानाधारक उत्पादन श्रेणी तंत्रज्ञान भागीदाराशी टाय-अप केलेला नाही. 

दोन्ही कंपन्यांकडे सेमी कंडक्टर निर्मितीचा अनुभव नाहीसेमीकंडक्टर प्लांट उभारणे हे फार अवघड काम आहे. गुंतागुंतीने भरलेले हे क्षेत्र आहे ज्यात कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली जाते. त्याच वेळी, त्याचे प्लांट चालविण्यासाठी बऱ्याच तज्ञ लोकांची आवश्यकता आहे. वेदांता ग्रुप खाण क्षेत्रात काम करत आहे, तर फॉक्सकॉन आयफोन असेंबलिंगचे काम करत आहे. अशा परिस्थितीत सेमीकंडक्टर बनवण्याचे कौशल्य दोघांकडे नाही. असं असलं तरी, दोन्ही गट मोठ्या गुंतवणुकीसह भारतातील संधीचा फायदा घेऊन देशातील पहिला सेमीकंडक्टर प्लांट उभारण्याचा प्रयत्न करत आहेत.

१ लाखाचा लॅपटॉप ४०,००० रुपयांत!अनिल अग्रवाल यांनी जेव्हा या संयुक्त उपक्रमाची घोषणा केली तेव्हा त्यांनी एका मुलाखतीत म्हटंल होतं की, भारतातील या पहिल्या सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले ग्लास प्लांटमुळे भारतात लॅपटॉप, टीव्ही आणि मोबाईल फोन खूपच स्वस्त होतील आणि त्यांची किंमत कमी होईल. किमती थेट अर्ध्यावर येऊ शकतात. 

अनिल अग्रवाल म्हणाले की, हा प्लांट तयार झाल्यानंतर १ लाख रुपयांचा लॅपटॉप ४० हजार रुपयांना मिळणार आहे. त्यांची कंपनी १० वर्षांपासून या प्रकल्पावर काम करत आहे आणि आता ते भारताची स्वतःची 'सिलिकॉन व्हॅली' बनवण्याच्या एक पाऊल पुढे आहेत.

टॅग्स :लॅपटॉप