Join us  

भारत बनला जगातील दुसरा सर्वात मोठा एलपीजी ग्राहक असलेला देश

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2019 5:42 AM

उज्ज्वला योजनेच्या प्रसारानंतर भारत हा जगातील दुसरा सर्वांत मोठा एलपीजी ग्राहक असलेला देश बनला आहे.

नवी दिल्ली  - उज्ज्वला योजनेच्या प्रसारानंतर भारत हा जगातील दुसरा सर्वांत मोठा एलपीजी ग्राहक असलेला देश बनला आहे. पेट्रोलियम सचिव एम. एम. कुट्टी यांनी मंगळवारी सांगितले की, देशात एलपीजीची मागणी २०२५ पर्यंत ३४ टक्के वाढण्याची शक्यता आहे.आशिया एलपीजी संमेलनात संबोधित करताना कुट्टी म्हणाले की, एलपीजी ग्राहकांच्या संख्येत वार्षिक आधारावर १५ टक्के वाढ झाली आहे. वर्ष २०१४-१५ मध्ये एलपीजी ग्राहकांची संख्या १४.८ कोटी होती ती संख्या २०१७-१८ मध्ये वाढून २२.४ कोटी झाली आहे. प्रत्येक कुटुंबाला स्वच्छ गॅस इंधन उपलब्ध करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.लोकसंख्या वाढ आणि ग्रामीण भागात एलपीजीचा झालेला विस्तार यामुळे एलपीजी ग्राहकांच्या संख्येत सरासरी ८.४ टक्के वाढ झाली आहे. यामुळे २.२५ कोटी टनसह भारत जगातील दुसरा सर्वांत मोठा एलपीजी ग्राहक असलेला देश झाला आहे. २०२५ पर्यंत एलपीजीचा वापर वाढून ३.०३ कोटी टनपर्यंत जाईल. २०४० पर्यंत हा आकडा ४.०६ कोटी टनवर जाईल. कुट्टी यांनी सांगितले की, सरकारने देशात एलपीजीला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. विशेषत: ग्रामीण कुटुंबात एलपीजीच्या वापराला प्रोत्साहन देण्यात येत आहे.६ कोटी गरीब महिलांना लाभग्रामीण भागातील कुटुंबे परंपरागत इंधनावर अवलंबून असतात. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत ६.३१ कोटी गॅस कनेक्शन उपलब्ध करण्यात आले आहेत. ही योजना १ मे २०१६ रोजी सुरू झाली. आतापर्यंत ६ कोटी गरीब महिलांना एलपीजी कनेक्शन देण्यात आली. सन २०२० पर्यंत आणखी दोन कोटी कनेक्शन देण्याचे लक्ष्य आहे. ते म्हणाले की, देशात एलपीजीचा पुरवठा ९० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. ही संख्या २०१४ मध्ये ५५ टक्के होती.

टॅग्स :भारत