Join us

निर्देशांकांचे उच्चांक सुरूच, मात्र व्यवहारात सावधपणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2018 06:27 IST

मुंबई - गेले दोन आठवडे सुरू असलेले निर्देशांकांचे उच्चांक या सप्ताहामध्येही कायम राहिले. संवेदनशील आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांनी नवीन उच्चांक गाठले आहेत. अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्धाबाबतची बंद झालेली चर्चा आणि डॉलरच्या तुलनेत कमी झालेली रुपयाची किंमत, यामुळे बाजारामध्ये काहीसे चिंतेचे वातावरण होते. त्यामुळेच व्यवहारात सावधपणा दिसून आला, तसेच ते काहीसे कमी झाले.

मुंबई शेअर बाजारात सप्ताहाचा प्रारंभ हा वाढीव पातळीवर झाला. गुरुवारी संवेदनशील निर्देशांकाने ३८४८७.६३ अंश तर निफ्टीने ११६२०.७० अंश असे नवीन उच्चांक नोंदविले. त्यानंतर मात्र, सप्ताहाच्या अखेरीस बाजारात विक्री वाढल्याने बाजार खाली आला. सप्ताहामध्ये संवेदनशील निर्देशांक ३०३.९२ अंश (०.८० टक्के) वाढून ३८२५१.८० अंशांवर बंद झाला. राष्टÑीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) ८६.३५ अंश (०.७५ टक्के) वाढून ११५५७.१० अंशांवर बंद झाला .गेले पाच सप्ताह बाजार वाढीव पातळीवर बंद होत आहे.

मिडकॅप या निर्देशांकामध्ये २४३.३० अंश (१.५ टक्के) वाढ होऊन १६५५२.७४ अंशांवर बंद झाला. स्मॉलकॅप निर्देशांकामध्ये मात्र १.७८ अंशांनी घट झाली. तो १६८६४.४३ अंशांवर बंद झाला. डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाची कमी झालेली किंमत गतसप्ताहामध्ये काहीशी स्थिर राहिली. औषध निर्मिती तसेच माहिती तंत्रज्ञान आस्थापनांना याचा फायदा झाला. यामुळे या आस्थापनांचे समभाग तेजीत राहिले. मात्र, बँकिंग आस्थापनांना विक्रीचा तडाखा सहन करावा लागत आहे. सातत्याने वाढत असलेल्या खनिज तेलाच्या किमती आता स्थिर होऊ लागल्यानेही बाजारात खरेदी झाली.

अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्ध थांबविण्यासाठी सुरू असलेली चर्चा कोणत्याही निर्णयाविना संपली. यामुळे जगभरातील शेअर बाजारांमध्ये चिंता निर्माण झाली. याचाच परिणाम सप्ताहाच्या अखेरीस भारतीय शेअर बाजारांमध्ये घसरणीने दिसून आला.

टॅग्स :सेन्सेक्सव्यवसाय