Join us

वाढीव शुल्क ९० दिवस स्थगित; अमेरिका, चीनची ११५ टक्के कपात करण्यास मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 06:59 IST

अमेरिकी व्यापार प्रतिनिधी जेमिसन ग्रीर आणि अमेरिकी वित्तमंत्री स्कॉट बेसेंट यांनी सोमवारी जिनेव्हा येथे ही घोषणा केली.

लोकमत न्यूज नेटवर्क, जिनेव्हा :अमेरिका आणि चीन यांनी एकमेकांवर लावलेल्या अतिरिक्त आयात शुल्कास ९० दिवसांसाठी स्थगिती दिली. यामुळे जागतिक शेअर बाजारांनी मोठी उसळी घेतली. अमेरिकी व्यापार प्रतिनिधी जेमिसन ग्रीर आणि अमेरिकी वित्तमंत्री स्कॉट बेसेंट यांनी सोमवारी जिनेव्हा येथे ही घोषणा केली.

अमेरिकी व्यापार प्रतिनिधी जेमिसन ग्रीर यांनी सांगितले की, दोन्ही देशांनी वाढीव आयात शुल्कात ११५ टक्के कपात करण्यास मान्यता दिली आहे. अमेरिकेने चिनी वस्तूंवर १४५ टक्के आयात शुल्क लावले होते. ते घटवून ३० टक्के करण्यात आले आहे. 

यातून सहकार्याचा पाया बनेल : चीन

चीनच्या वाणिज्य मंत्रालयानेही निवेदनाद्वारे या समझोत्याचे समर्थन केले आहे. निवेदनात म्हटले की, समझाेता दोन्ही देशांत मतभेदावरील तोडग्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. यातून पुढील सहकार्यासाठी पाया तयार होईल. हा पुढाकार उत्पादक व ग्राहकांच्या हितचा आहे. यात जगाचेही हित साधले जाईल. एकतर्फी शुल्क वाढीच्या चुकीच्या प्रथांना या समझाेत्यामुळे आळा बसेल आणि जागतिक अर्थव्यवस्थेत अधिक स्थैर्य येईल, असे आम्हाला वाटते. 

एसअँडपी-५०० निर्देशांक २.६ टक्के तेजीत

या समझोत्यानंतर जगभरातील शेअर बाजारातील तेजी परतली. अमेरिकेचा एसअँडपी-५०० निर्देशांक २.६ टक्के वाढला. डाऊ जोन्स इंडस्ट्रिअल ॲव्हरेजमध्ये २ टक्के तेजी आली. कच्च्या तेलाच्या किमतीतही १.६० डॉलर प्रतिबॅरल वाढ झाली. तसेच युरो आणि जपानी येनच्या तुलनेत डॉलर मजबूत झाला.

 

टॅग्स :अमेरिकाचीन