Join us

नव्या वर्षात पीएफ काढा एटीएममधूनही; मे-जून २०२५ पर्यंत सुविधा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2024 08:00 IST

कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या  मृत सदस्यांच्या परिवारास कर्मचारी ठेव आधारित विमा योजनेत ७ लाख रुपयांपर्यंत रकमेचा विमा दिला जातो.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : येणाऱ्या नव्या वर्षात कर्मचारी भविष्य निधी संघटनेचे  सदस्य पीएफ एटीएममधूनही काढू शकतील, असे केंद्रीय श्रम सचिव सुमिता डावरा यांनी म्हटले आहे. मे-जून २०२५ पर्यंत ही सुविधा सुरू होईल, असे त्यांनी सांगितले. एका वृत्तानुसार, या सुविधेसाठी केंद्रीय श्रम मंत्रालय माहिती तंत्रज्ञान पायाभूत सुविधा अद्ययावत करीत आहे, असे डावरा यांनी सांगितले.

डावरा यांनी म्हटले की, श्रम व रोजगार मंत्रालय ईपीएफओच्या आयटी व्यवस्थेला अद्ययावत करीत आहे. यात पीएफचे दावे दाखल करणे व त्यांचा निपटारा करणे, ही प्रक्रिया अधिक सोपी होईल. जानेवारी २०२५ पर्यंत ईपीएफओच्या यंत्रणेत मोठे बदल पाहायला मिळतील.

प्रारंभी, ईपीएफ खात्यातील एकूण रकमेच्या ५० टक्क्यांपर्यंतची रक्कम सदस्यास एटीएमद्वारे काढता येऊ शकेल. ही सुविधा लाभार्थ्यांसोबतच त्यांचे उत्तराधिकारी आणि मृत सदस्यांच्या परिवारातील सदस्यांनाही उपलब्ध करून देण्यात येईल.

‘एडीएलआय’ विमा रक्कमही काढणे शक्य

कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या  मृत सदस्यांच्या परिवारास कर्मचारी ठेव आधारित विमा योजनेत ७ लाख रुपयांपर्यंत रकमेचा विमा दिला जातो. ही रक्कमही काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. 

टॅग्स :पीपीएफकर्मचारी