Join us

६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 14:19 IST

कंपनीनं मे २०२५ मध्ये सुमारे ६,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं होतं. जून महिन्याच्या सुरुवातीला कंपनीनं ३०० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकल्याची माहिती समोर आली होती.

Microsoft Layoff: टेक दिग्गज मायक्रोसॉफ्ट पुन्हा एकदा कर्मचारी कपात करण्याच्या तयारीत आहे. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, एक्सबॉक्स डिविजन आणि ग्लोबल सेल्स टीममधील मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांना काढण्यात येणार आहे. १८ महिन्यांत एक्सबॉक्स डिविजनमधील ही चौथी मोठी कपात असेल. कंपनी आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये गुंतवणूक वाढवत आहे. एआयमुळे कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये कपात करत आहे. मायक्रोसॉफ्ट जुलैच्या सुरुवातीला नोकरभरतीची घोषणा करणार आहे. मायक्रोसॉफ्ट १ जुलै ते ३० जून हे आर्थिक वर्ष पाळते. जून २०२४ पर्यंत कंपनीत २.२८ लाख पूर्णवेळ कर्मचारी होते. यातील ५५ टक्के लोक अमेरिकेत काम करत होते.

मायक्रोसॉफ्टवर खर्चात कपात करण्यासाठी आणि नफा वाढविण्यासाठी दबाव आहे. कंपनीनं २०२३ मध्ये अॅक्टिव्हिजन ब्लिझार्ड ६९ अब्ज डॉलरमध्ये विकत घेतल्यानंतर दबाव आणखी वाढला आहे. यापूर्वी मायक्रोसॉफ्टनं मे २०२५ मध्ये सुमारे ६,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं होतं. जून महिन्याच्या सुरुवातीला कंपनीनं ३०० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकल्याची माहिती समोर आली होती.

एप्रिलमध्ये मायक्रोसॉफ्टने लघु आणि मध्यम उद्योगांसाठी (एसएमबी) थर्ड पार्टी विक्रेत्यांना सॉफ्टवेअर विकण्याचं काम देण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे कंपनीची अनेक अंतर्गत पदे आता अतिरिक्त झाली आहेत, त्यामुळे कर्मचारी कपातीची गरज आणखी वाढली असल्याचं म्हटलं जातंय.

AI मध्ये गुंतवणूक वाढवतेय कंपनी

मायक्रोसॉफ्ट एआयमध्ये गुंतवणूक वाढवत आहे. उद्योगांमधील बऱ्याच कंपन्या त्यांच्या उत्पादने आणि सेवांमध्ये एआयच्या इंटिग्रेशनला गती देत आहेत. कंपन्या आता एआयशी संबंधित नोकऱ्यांना प्राधान्य देत आहेत आणि पैसे वाचविण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करीत आहेत. मायक्रोसॉफ्टनं चालू आर्थिक वर्षात ८० अब्ज डॉलर्सच्या भांडवली खर्चाची योजना आखली आहे. त्याचा बहुतांश उद्देश एआय सेवांसाठी क्षमतेच्या मर्यादा कमी करण्यासाठी डेटा सेंटरचा विस्तार करणं हाच आहे.

टॅग्स :नोकरी