Join us

एक कोटीची किंमत 30 लाख झाली तर...; महागाईचे गणित लक्षात घेत करा गुंतवणुकीचे नियोजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 08:30 IST

हे गणित लक्षात घेऊनच निवृत्तीसाठी नियोजन करायला हवे. नेमके काय करायला हवे हे जाणून घेऊ...

नवी दिल्ली : फेब्रुवारीत किरकोळ क्षेत्रातील महागाईचा दर ६.४ टक्के होता. महागाई अशीच कायम राहिली तर आजच्या १ कोटी रुपयांची किंमत २० ते २५ वर्षांनी अवघी ३० लाख रुपये राहील. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास जे काम आज ३० ते ३५ लाख रुपयांत होऊ शकते, त्यासाठी २० वर्षांनंतर एक कोटी रुपये लागतील. भविष्यासाठी गुंतवणूक करताना ही बाब लक्षात ठेवणे आवश्यक आहे. आज तुमचा महिन्याचा खर्च ५० हजार रूपये असेल, तर २० वर्षांनी ते १.५० कोटी रुपये होईल. हे गणित लक्षात घेऊनच निवृत्तीसाठी नियोजन करायला हवे. नेमके काय करायला हवे हे जाणून घेऊ...

भविष्यातील गुंतवणूक मूल्यतुम्ही मासिक १० हजार रुपयांची गुंतवणूक एसआयपीद्वारे केल्यास तसेच १२ टक्के परतावा गृहीत धरल्यास २० वर्षांनी तुमची गुंतवणूक १ कोटी रुपयांची होईल. मात्र, त्यात महागाई समायोजित केल्यास या गुंतवणुकीचे मूल्य ४६ हजार रुपयेच असेल. त्यामुळे तुम्हाला २० वर्षांनी १ कोटी रुपयांचे लक्ष्य ठरवायचे असेल तर तुमच्या लक्ष्यापेक्षा ५० टक्के अधिक गुंतवणूक करायला हवी म्हणजेच १ कोटीसाठी लक्ष्य १.५ कोटी रुपये ठेवावे लागेल.

दीर्घकालीन गुंतवणूक करताना काय करावे ?दीर्घकालीन गुंतवणूक करायची तर गुंतवणुकीची सुरुवातीला नेमकी यादी करावी. म्हणजेच गुंतवणूक कोणकोणत्या मार्गाने आणि किती परतावा देणारी ठरेल हे एकदा अभ्यासून घ्यावे. दीर्घकालीन गुंतवणूक करताना किमान परतावा १५ ते १६% असावा, असा विचार करून गुंतवणूक करावी. त्यामुळेच वाढत्या महागाईसमोर टिकाव लागू शकतो.

कुठे कराल गुंतवणूक ?२० वर्षांच्या दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंड हा चांगला पर्याय आहे. बाजारात १२ ते १५ टक्के परतावा देणाऱ्या अनेक म्युच्युअल फंड योजना आहेत. टाटा लार्ज अँड मिडकॅप फंड, निप्पॉन इंडिया ग्रोथ फंड, फ्रँकलिन इंडिया प्राइमा फंड, यूटीआय मास्टर शेअर फंड, एसबीआय लॉर्ज अँड मिडकॅप फंड आणि डीएसपी इक्विटी अपॉर्च्युनिटी फंड यांचा त्यात समावेश आहे.

(स्रोत : व्हॅल्यू रिसर्च)

टॅग्स :व्यवसाय