Join us
Daily Top 2Weekly Top 5

जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 10:33 IST

US Iran Israel War: इराण युद्धाला एक महिन्याहून अधिक काळ लोटला असून सध्या तरी हे युद्ध थांबण्याची कोणतीही चिन्हं दिसत नाहीत. यामुळे जगभरात खाद्यपदार्थांच्या किमतीत मार्च महिन्यात मोठी वाढ झाली.

US Iran Israel War: इराण युद्धाला एक महिन्याहून अधिक काळ लोटला असून सध्या तरी हे युद्ध थांबण्याची कोणतीही चिन्हं दिसत नाहीत. यामुळे जगभरात खाद्यपदार्थांच्या किमतीत मार्च महिन्यात मोठी वाढ झाली असून, त्या गेल्या वर्षीच्या सप्टेंबरनंतरच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचल्या आहेत. याचं मुख्य कारण म्हणजे अलीकडच्या काळात कच्च्या तेलाच्या आणि नॅचरल गॅसच्या किमतीत झालेली प्रचंड वाढ हे आहे. संयुक्त राष्ट्रांची संस्था 'फूड अँड अॅग्रीकल्चर ऑर्गनायझेशन'च्या (FAO) मते, जर इराण युद्ध असंच सुरू राहिलं, तर खाण्यापिण्याच्या वस्तूंच्या किमतीत भविष्यात आणखी वाढ होऊ शकते.

रॉयटर्सच्या अहवालानुसार, एफएओचे (FAO) मुख्य अर्थतज्ज्ञ मॅक्सिमो तोरेरो यांनी सांगितलं की, युद्ध सुरू झाल्यापासून कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे खाद्यपदार्थांच्या किमतीत काही प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र, जगात धान्याचा पुरेसा पुरवठा असल्यानं किमतीत फार मोठी अशी तेजी आलेली नाही. तरीही, जर हे युद्ध ४० दिवसांपेक्षा जास्त काळ खेचलं गेलं आणि कच्च्या मालाच्या किमती वाढलेल्याच राहिल्या, तर शेतकरी पेरणीचे क्षेत्र कमी करू शकतात किंवा ज्या पिकांमध्ये कमी खतांचा वापर होतो अशा पिकांकडे वळू शकतात.

PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम

उत्पादनावर होणारा संभाव्य परिणाम

तोरेरो यांच्या मते, जर शेतकऱ्यांनी पिकांचं स्वरूप बदललं, तर त्याचा भविष्यातील उत्पादनावर परिणाम होईल, ज्यामुळे अन्नपुरवठा आणि कमोडिटीच्या किमतींवर विपरीत परिणाम होऊ शकतो. एफएओचा 'फूड प्राईस इंडेक्स' फेब्रुवारीच्या तुलनेत मार्चमध्ये २.४ टक्क्यांनी वाढला आहे. हा इंडेक्स गेल्या वर्षीच्या तुलनेत १ टक्का जास्त आहे. मात्र, मार्च २०२२ च्या उच्चांकाच्या तुलनेत तो अजूनही सुमारे २० टक्क्यांनी खाली आहे.

मार्च महिन्यात खाद्यपदार्थांच्या किमतीत झालेली वाढ :

  • किमती गेल्या वर्षीच्या सप्टेंबरनंतरच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचल्या.
  • कच्च्या तेलाचे दर वाढल्यामुळे खतांचं संकट गडद झालं.
  • खतांच्या टंचाईमुळे शेतकरी इतर पिकांकडे वळण्याची शक्यता आहे.  

धान्याच्या किमती दर्शवणारा निर्देशांक फेब्रुवारीच्या तुलनेत मार्चमध्ये १.५ टक्क्यांनी वाढला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर गव्हाच्या किमतीत ४.३ टक्क्यांनी वाढ झाली असून, अमेरिकेतील पीक खराब होण्याची भीती आणि खतांच्या संकटामुळे ऑस्ट्रेलियात झालेली कमी पेरणी ही याची मुख्य कारणं आहेत. मक्याच्या किमतीत किंचित वाढ झाली आहे, तर मागणी कमी असल्यामुळे तांदळाच्या किमती ३ टक्क्यांनी घसरल्यात.

वनस्पती तेल आणि साखरेच्या किमती

वनस्पती तेलाच्या किमती ५.१ टक्क्यांनी वाढल्या असून सलग तिसऱ्या महिन्यात ही वाढ दिसून आली आहे. पाम तेल २०२२ च्या मध्यांतरानंतरच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचलं आहे. साखरेच्या किमतीत मार्चमध्ये ७.२ टक्के वाढ झाली असून ही गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरनंतरची सर्वात मोठी वाढ आहे. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे ब्राझील जास्त इथेनॉल तयार करू शकतो, असा अंदाज आहे. ब्राझील हा जगातील साखरेचा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे. याव्यतिरिक्त, मार्चमध्ये मीटच्या किमतीत १ टक्क्यानं वाढ झाली आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Iran War Could Trigger Food Crisis If It Lasts 40 Days

Web Summary : Continued Iran conflict may hike food prices. Rising oil costs are already impacting markets. A prolonged war could shift farming practices, affecting global food supply and commodity prices, according to FAO.
टॅग्स :अन्नअमेरिका-इस्रायल-इराण वॉरदर वाढ