Join us

बँक खात्यात फक्त 3 हजार रुपये, तरीही खरेदी करता येणार स्वतःचं घर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2020 11:16 IST

ICICI होम फायनान्सने दिल्लीत असंघटित क्षेत्रात काम करणा-या कुशल कामगारांसाठी 'अपना घर ड्रीम' ही नवीन कर्ज योजना सुरू केली आहे.

कोरोना काळात मोदी सरकारने सुमारे 21 लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. या पॅकेजअंतर्गत कर्ज देऊन लोकांना स्वावलंबी करण्यावर भर देण्यात येत आहे. बँका किंवा गृहनिर्माण वित्त कंपन्यांनी सर्व प्रकारच्या कर्ज घेण्याची प्रक्रिया सुलभ केली आहे. बर्‍याच बँका आता नाममात्र कागदपत्रे किंवा अटींवरही कर्ज देत आहेत. विशेष म्हणजे आता ICICI होम फायनान्सदेखील नाममात्र अटींवर गृह कर्जे देत आहे. ICICI होम फायनान्सने दिल्लीत असंघटित क्षेत्रात काम करणा-या कुशल कामगारांसाठी 'अपना घर ड्रीम' ही नवीन कर्ज योजना सुरू केली आहे.याअंतर्गत 2 लाख ते 50 लाख रुपयांपर्यंतची कर्ज घेता येत आहेत. कंपनीने सांगितले की, या योजनेत शहरातील सुतार, इलेक्ट्रिशियन, टेलर, पेंटर्स, वेल्डिंग कामगार, नळ ठीक करणारे (प्लंबर), वाहन मिस्त्री, मॅन्युफॅक्चरिंग मशीन चालवणारे, आरओ फिक्सर्स, छोटे आणि मध्यम उद्योग करणारे आणि किराणा दुकानदारांचा समावेश आहे. कागदपत्रांच्या स्वरूपात त्यांना फक्त पॅन (कायम खाते क्रमांक) आणि आधार अथवा सहा महिन्यांच्या बँक खात्याचा तपशील द्यावा लागतो. या योजनेंतर्गत ग्राहक 20 वर्षांसाठी कर्ज घेऊ शकतात. पाच लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी किमान 1,500 रुपये तर 5 लाख रुपयांपेक्षा जास्त कर्जासाठी किमान 3,000 रुपये खात्यात असले पाहिजेत.आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध कामानी म्हणाले की, आयसीआयसीआय होम फायनान्समधील आमचे उद्दिष्ट असंघटित क्षेत्रातील कष्टकरी व्यावसायिक आणि स्थानिक छोटे व्यवसायांना स्वतःचे घर विकत घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कर्ज देणे हा आहे. कंपनीने म्हटले आहे की, ग्राहक प्रधानमंत्री आवास योजने(पीएमएवाय)चा फायदा देखील घेऊ शकतात. अल्प उत्पन्न गट/आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस/एलआयजी) आणि मध्यम उत्पन्न गटा(एमआयजी -1 आणि 2)साठी एक क्रेडिट लिंक्ड सबसिडी योजना आहे. या योजनेंतर्गत कर्जदारास जास्तीत जास्त 2.67 लाख रुपयांचे अनुदान मिळू शकते.

टॅग्स :प्रधानमंत्री आवास योजना