Join us

मोठा घोटाळा! ICICI बँकेच्या माध्यमातून पतीसाठी ५ कोटींचा फ्लॅट ११ लाखांना खरेदी केला, मित्रांनाही पैसा वाटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2023 18:44 IST

आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून १.२५ कोटी रुपयांचा फ्लॅट आपल्या पतीला फक्त ११ लाख रुपयांना मिळवून दिल्याचे उघडकीस आले.

आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांनी आपल्या पदाचा वापर करून मोठा घोटाळा केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाचा तपास करणार्‍या सीबीआयने न्यायालयाला सांगितले आहे की, कोचर यांनी व्हिडिओकॉन समूहाला मोठ्या प्रमाणात कर्जे देण्यासाठी आपल्या पदाचा वापर केला. त्यांनी पतीला १.२५ कोटी रुपयांचा फ्लॅटही अवघ्या ११ लाख रुपयांत मिळवून दिला.

मोठी बातमी! चंद्रशेखर आझाद यांच्यावर जीवघेणा हल्ला; अज्ञातांनी झाडल्या गोळ्या, रूग्णालयात दाखल

सीबीआयचे विशेष सरकारी वकील ए लिमोसिन यांनी न्यायालयाला सांगितले की, कोचर यांच्या ट्रस्टला २०१६ मध्ये व्हिडिओकॉन ग्रुपने सीसीआय चेंबर्स, चर्चगेटमध्ये केवळ ११ लाख रुपयांना फ्लॅट दिला होता. मात्र, त्यावेळी या फ्लॅटची किंमत ५.३ कोटी रुपये होती. याशिवाय चंदा यांनी बँकेच्या निधीचा गैरवापर करून बेकायदेशीररीत्या ६४ कोटी रुपये स्वत:साठी मिळवले होते. चंदा कोचर यांच्या मुलाने त्याच इमारतीच्या त्याच मजल्यावर १९.११ कोटी रुपयांना फ्लॅट खरेदी केला होता.

सीबीआयने ११ हजार पानांचे आरोपपत्र न्यायालयात सादर केले आहे. यामध्ये चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर, व्हिडिओकॉन समूहाचे प्रवर्तक वेणुगोपाल धूत आणि इतरांना आरोपी करण्यात आले आहे. चंदा कोचर यांनी पात्र नसतानाही चंदा कोचर यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला आणि व्हिडिओकॉन समूहाला मोठी कर्जे दिली, असे आरोपपत्रात सीबीआयने म्हटले आहे. बँकेच्या निधीचा चुकीचा वापर करून कोचर यांनी स्वतःला ६४ कोटी रुपयांचा बोनस मिळवून दिला.

सीबीआयच्या वकिलांनी सांगितले की, व्हिडिओकॉनला २६ ऑगस्ट २००९ रोजी आयसीआयसीआय बँकेकडून ३०० कोटींचे मुदत कर्ज देण्यात आले होते. चंदा कोचर या कर्जासाठी स्थापन करण्यात आलेल्या बँकेच्या समितीच्या प्रमुख होत्या. ७ सप्टेंबर २००९ रोजी कर्जाची रक्कम कंपनीच्या खात्यात जमा झाली यावरून घाईचा अंदाज लावता येतो. व्हिडिओकॉनने अनेक शेल कंपन्या तयार केल्या आणि त्याद्वारे ६४ कोटी रुपये दीपक कोचर यांच्या कंपनीला हस्तांतरित केले.

सीबीआयने जानेवारी २०१९ मधील एका प्रकरणात आरोप केला होता की, कोचर यांनी बँकेचे एमडी आणि सीईओ असताना सहा कंपन्यांना १,८७५ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले होते. नंतर त्याची पुनर्रचना करून १,७३० कोटी रुपये करण्यात आले. त्यापैकी १,०३३ कोटी रुपयांचे कर्ज अद्याप थकीत आहे. यामध्ये व्हिडिओकॉन इंटरनॅशनल इलेक्ट्रॉनिक्सला ३०० कोटी रुपयांची दोन आणि व्हिडिओकॉन इंडस्ट्रीजला ७५० कोटी रुपयांची कर्जे देण्यात आली आहेत. हे दोन्ही कर्ज मंजूर करणाऱ्या समितीच्या प्रमुख चंदा कोचर होत्या.

टॅग्स :धोकेबाजीआयसीआयसीआय बँकन्यायालय