Join us
Daily Top 2Weekly Top 5

सामान्यांच्या खिशाला आणखी कात्री! पार्ले जीनंतर आता साबण व डिटर्जंट पावडरच्या किंमतीत मोठी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2021 18:47 IST

आता हिंदुस्थान युनिलिव्हर आणि आयटीसी कंपन्यांनी साबण आणि डिटर्जंटच्या किंमतीत वाढ केली आहे. 

नवी दिल्ली: देशात आताच्या घडीला पेट्रोल आणि डिझेलचे दर सार्वकालिक उच्चांकावर असल्यामुळे महागाईचा दरही वाढल्याचे पाहायला मिळत आहे. अलीकडेच पार्ले जी बिस्किटाचे दर वाढवणार असल्याचे सांगितले जात असतानाच आता हिंदुस्थान युनिलिव्हर आणि आयटीसी कंपन्यांनी साबण आणि डिटर्जंटच्या किंमतीत वाढ केली आहे. 

व्हील डिटर्जंट पावडर, रिन बार आणि लक्स साबण यांच्या किमती ३.४ ते २१.७ टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत. त्याचवेळी, आयटीसीने फियामा साबणाच्या किंमतीत १० टक्के, विवेलमध्ये ९ टक्के आणि ऐंगेज डियोड्रंटमध्ये ७.६ टक्के वाढ केली आहे. वाढती महागाई नजीकच्या काळात सामान्यांना धुवून काढणार आहे.

साबणाच्या किमतीत २५ रुपयांची मोठी वाढ

रिन बारच्या २५० ग्रॅम पॅकची किंमत ५.८ टक्के वाढली आहे. एफएमसीजीची मोठी कंपनीने लक्स साबण १०० ग्रॅम मल्टीपॅक २१.७ टक्के म्हणजेच २५ रुपयांनी वाढली आहे. त्याच वेळी, आयटीसीने फियामा साबण १०० ग्रॅम पॅकची किंमत १० टक्क्यांनी वाढविली आहे. तर कंपनीने विवेल साबणाच्या १०० ग्रॅम पॅकची किंमतीत ९ टक्क्यांनी वाढ केली आहे. या अहवालात असे म्हटले आहे की कंपनीने १५० मिली ऐंगेज डियोड्रंटच्या किंमतीत ७.६ टक्के आणि १२० मिलीच्या ऐंगेज परफ्युममध्ये ७.१ टक्क्यांची वाढ केली आहे.

ग्राहकांवर किंमत वाढीचा पूर्ण दबाव पडणार नाही

किंमत वाढविण्याच्या मागे दिलेल्या स्पष्टीकरणात कंपन्यांनी असे म्हटले आहे की, त्यांनी निवडक गोष्टींच्या किंमतीत बदल केला आहे. ग्राहकांवर किंमत वाढीचा पूर्ण दबाव पडणार नाही, याचीही काळजी घेण्यात आली आहे. दुसऱ्या तिमाहीत हिंदुस्तान युनिलिव्हर वार्षिक आधारावर ९ टक्के वाढ झाली आहे. कंपनीचा नफा २१८७ कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो अंदाजापेक्षा थोडासा कमी आहे.

दरम्यान, दोन प्रमुख उपभोक्ता वस्तू कंपन्यांनी उत्पादन खर्च वाढल्याने किंमतींमध्ये वाढ केली आहे, असे कारण सांगितले आहे. व्हील डिटर्जेंटच्या १ किलो पॅकच्या किंमतीमध्ये एचयूएलने ३.४ टक्के वाढ केली आहे. यामुळे ते २ रुपयांनी महाग झाले आहे. ५०० ग्रॅम व्हील पावडरच्या किंमतीत कंपनीने दोन रुपये वाढविले आहेत. ही किंमत आता २८ रुपयांवरून ३० रुपये झाली आहे. 

टॅग्स :महागाई