Join us

न वापरलेले व्हिडीओ विकूनही मोठी कमाई, अल्गोरिदमच्या ट्रेनिंगसाठी ‘एआय’ कंपन्यांकडून खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 07:10 IST

गुणवत्ता आणि फॉरमॅट चांगला असलेल्या व्हिडीओंना अधिक किंमत मिळत आहे. यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि टिकटॉक यांसाठी चित्रित करण्यात आलेल्या साधारण व्हिडीओजसाठी प्रति मिनिट १५० रुपये दिले जात आहेत.

नवी दिल्ली : यूट्यूबर आणि डिजिटल कंटेंट क्रिएटर मंडळी आता केवळ आपले व्हिडीओ प्रसिद्ध करूनच नव्हे, तर न वापरलेले व्हिडिओ विकूनही मोठी कमाई करीत आहे.

ओपनएआय, गुगल आणि मून व्हॅली यांसारख्या ‘एआय’ कंपन्या आपल्या अल्गोरिदमला ट्रेनिंग देण्यासाठी हे व्हिडीओ खरेदी करीत आहेत. हे व्हिडीओ अद्वितीय असतात तसेच ‘एआय’ यंत्रणांना अधिक उत्तम बनविण्यासाठी उपयुक्त असतात.

गुणवत्ता आणि फॉरमॅट चांगला असलेल्या व्हिडीओंना अधिक किंमत मिळत आहे. यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि टिकटॉक यांसाठी चित्रित करण्यात आलेल्या साधारण व्हिडीओजसाठी प्रति मिनिट १५० रुपये दिले जात आहेत.

कंपन्या इंटरनेटवरील व्हिडीओ वापरून मॉडेल्सना प्रशिक्षित करीत होत्या. यामुळे कंटेंट क्रिएटर्स आणि अभिनेत्यांनी  परवानगीशिवाय त्यांच्या सामग्रीचा वापर केल्याने नाराजी व्यक्त केली होती. हे टाळण्यासाठी कंपन्यांनी जुने फुटेज विकत घेणे सुरु केले आहे. 

का वाढली व्हिडिओ फुटेजची गरज?ओपनएआय, मेटा आणि ॲडोब यांसारख्या कंपन्यांनी गेल्या वर्षी एआय व्हिडीओ जनरेटर लाँच केले होते. हे जनरेटर टेक्स्ट प्रॉम्प्टच्या आधारे कृत्रिम व्हिडीओ फुटेज तयार करतात. हे फुटेज खऱ्या व्हिडिओंसारखेच दिसते. या यंत्रणांना ट्रेनिंग देण्यासाठी मोठ्या प्रमाणात डाटा आणि व्हिडीओ फुटेजची गरज असते. स्पर्धेत पुढे राहण्यासाठी कंपन्यांना जास्तीत जास्त डाटा हवा आहे.

३५० रुपये इतकी रक्कम मेटा एआयसारख्या कंपन्या केवळ १ मिनिटाच्या व्हिडिओ फुटेजसाठी देत आहेत. ४के गुणवत्ता, ड्रोन फुटेजसाठी जास्त पैसे देत आहेत. 

टॅग्स :व्यवसाय