लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : भारतीय पर्यटन क्षेत्र येत्या काही वर्षांत मोठी झेप घेणार असून, यामुळे तब्बल ५० लाख नवीन नोकऱ्या निर्माण होण्याची आशा आहे, अशी माहिती कॅपिटल माइन्डच्या ताज्या अहवालात देण्यात आली आहे.
तसेच, २०२८ पर्यंत भारतीय पर्यटन बाजारपेठेत तब्बल ५.१ लाख कोटी रुपयांची वाढ अपेक्षित असल्याचेही या अहवालात म्हटले आहे. ही वाढ केवळ पर्यटकांच्या संख्येत नव्हे, तर पर्यटनाच्या प्रकारांमध्येही वैविध्य आणेल.
धार्मिक पर्यटन, आयुर्वेद, योग आणि वेलनेस यांसारख्या क्षेत्रांना केंद्र सरकारसह विविध राज्य सरकारेदेखील प्रोत्साहन देत असून यामुळे ग्रामीण भागांतही मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होतील.
कोणकोणत्या रोजगाराच्या संधी?
- सरकार आयुर्वेद, योग आणि धार्मिक पर्यटनाला प्रोत्साहन देत आहे. यामुळे या क्षेत्रांशी संबंधित सेवांमध्ये मोठ्या प्रमाणावर नोकरभरती होईल.
- हॉटेल्स आणि रिसॉर्टसची संख्या वाढल्याने, व्यवस्थापक, शेफ, स्वच्छता कर्मचारी, ग्राहक सेवा प्रतिनिधी यांसारख्या पदांसाठी नोकऱ्यांची संख्या वाढेल.
- पर्यटकांची संख्या वाढल्यामुळे विमानतळ, रेल्वे, टॅक्सी सेवा आणि स्थानिक वाहतूक उद्योगातही नोकऱ्यांची निर्मिती होणार आहे.
होम स्टे, रिसॉर्टस्, स्थानिक सेवांची वाढती मागणी
- पर्यटन क्षेत्रातील रोजगार आणि बाजारपेठेतील वाढ प्रामुख्याने देशांतर्गत पर्यटनामुळे होत आहे. मोठ्या शहरांमधील नागरिक आता शांत आणि निसर्गाशी जवळीक साधणाऱ्या ठिकाणी सुट्टी घालवण्याला प्राधान्य देत आहेत.
- यामुळे लहान शहरे आणि गावांमध्ये होम स्टे, रिसॉर्टस् आणि स्थानिक सेवांची मागणी वाढली आहे. यामुळे स्थानिक पातळीवर अनेक व्यवसाय आणि नोकऱ्यांची निर्मिती होत आहे.
रोजगाराची प्रमुख क्षेत्रे : हॉटेल्स, ट्रॅव्हल एजंट, वाहतूक, रेस्टॉरंट्ससर्वाधिक वाढीची राज्ये : गोवा, राजस्थान, केरळ आणि उत्तराखंड