Fake Products Risk in Online Shopping : गेल्या दोनचार वर्षात क्विक कॉमर्स क्षेत्रात झपाट्याने वाढ झाली आहे. लोक आता सेफ्टी पिनपासून सॅटेलाईटच्या डिशपर्यंत सर्वकाही ऑनलाईन मागवत आहेत. यात क्विक कॉमर्स कंपन्यांनी आणखी भर टाकली. आता खाण्यापासून किराण्यापर्यंत सर्वकाही १० मिनिटांत घरपोच होत आहे. मात्र, याचा गैरफायदा घेत ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म अॅमेझॉन आणि फ्लिटकार्टच्या लखनौ येथील गोदामांवर ब्युरो ऑफ स्टँडर्ड्सने (BIS) नुकताच छापा टाकला. यामध्ये हजारो ग्राहक उत्पादनांवर अनिवार्य BIS प्रमाणपत्र नसल्याचे समोर आले. याचा अर्थ ही उत्पादने बनावट असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे ऑनलाईन शॉपिंग करताना काय काळजी घ्यावी हे माहिती हवे.
बनावट वस्तू कशा ओळखायच्या?
- तुम्ही जी वस्तू ऑर्डर करणार आहात, त्या विक्रेत्याबद्दल माहिती घ्या. नेहमी “Amazon Fulfilled” किंवा “Flipkart Assured” टॅग असलेली उत्पादने खरेदी करा.
- ऑर्डर करण्यापूर्वी सेलर रेटिंग आणि रिव्यू तपासा. रेटिंग कमी असल्यास, सावधगिरी बाळगा.
- तुम्ही ज्या ब्रँडचे उत्पादन खरेदी करणार आहात, त्या ब्रँडचा अधिकृत विक्रेता शोधा.
- कोणत्याही उत्पादनाच्या रेटिंग आणि रिव्यूमध्ये “Fake”, “Duplicate”, “Not Original”, “Damaged” असे शब्द आढळल्यास ऑर्डर करू नका.
- जर एखादे महाग ब्रँडेड उत्पादन खूप कमी किमतीत उपलब्ध असेल, तर ते बनावट असण्याची शक्यता आहे. म्हणून ब्रँडच्या अधिकृत साइटला भेट देऊन उत्पादनाची किंमत तपासा.
डिलिव्हरी दरम्यान काय काळजी घ्यावी?
- पॅकेज खोलताना व्हिडीओ शूट करा. सर्व प्रथम ब्रँड आणि पॅकेजिंग तपासा.
- बॉक्सचे सील तुटले असल्यास किंवा ब्रँडिंगमध्ये काही चूक दिसल्यास तत्काळ रिटर्न करा.
- अस्सल ब्रँडेड उत्पादनांमध्ये बारकोड किंवा QR कोड असतात, जे तुम्ही स्कॅन करून तपासू शकता
- जर तुम्हाला प्रॉडक्टमध्ये संशयित प्रकार आढळल्यास ई कॉमर्स कंपनीच्या ग्राहक सेवेशी संपर्क साधा.