GST Complaint Toll Free Number : नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून, म्हणजेच २२ सप्टेंबरपासून देशभरात जीएसटीचे नवीन दर लागू झाले आहेत. किराणा सामानापासून वाहनांपर्यंत ४०० पेक्षा जास्त वस्तूंच्या किमती स्वस्त झाल्याचा दावा सरकारने केला आहे. पण, अजूनही काही दुकानदार ग्राहकांना नवीन किमतीचा फायदा देत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. जर तुम्हाला जीएसटीतील या कपातीचा फायदा मिळत नसेल, तर तुम्ही तातडीने तुमची तक्रार दाखल करू शकता. तुम्ही थेट टोल फ्री क्रमांक १९१५ वर कॉल करून किंवा व्हॉट्सअॅप क्रमांक ८८००००१९१५ वर मेसेज करून आपली तक्रार नोंदवू शकतात.
कुठे आणि कशी कराल तक्रार?केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क बोर्डने ग्राहकांसाठी वारंवार विचारले जाणाऱ्या प्रश्नांमध्ये (FAQs) ही माहिती दिली आहे. यानुसार, ग्राहक राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइनच्या टोल फ्री क्रमांक १९१५ वर किंवा ८८००००१९१५ या व्हॉट्सअॅप क्रमांकावर आपली तक्रार दाखल करू शकतात. याशिवाय, INGRAM (एकात्मिक तक्रार निवारण प्रणाली) पोर्टलवरही तक्रारी नोंदवण्याची सुविधा उपलब्ध आहे.
काय आहे नवीन जीएसटी सुधारणा?जीएसटीमध्ये झालेल्या व्यापक सुधारणांनुसार, आता ४ स्लॅब्सऐवजी फक्त २ स्लॅब (५% आणि १८%) ठेवण्यात आले आहेत. जुन्या सिस्टीममध्ये ५%, १२%, १८% आणि २८% असे चार स्लॅब होते. जीएसटीतील या कपातीमुळे रोजच्या वापरातील सुमारे ९९% वस्तूंच्या किमती कमी झाल्या आहेत, कारण यापूर्वी अनेक वस्तूंवर १८% जीएसटी होता आणि आता तो ५% झाला आहे. काही वस्तूंवरचा जीएसटी तर पूर्णपणे काढण्यात आला आहे.
वाचा - लाडकी बहीण, गॅस सबसिडी सारख्या योजनांचे पैसे अडकणार? १ ऑक्टोबरपूर्वी 'हे' काम करा पूर्ण
सरकार ठेवत आहे किमतींवर लक्षजीएसटीमध्ये झालेल्या कपातीनंतर सरकार वस्तूंच्या किमतींवर बारीक लक्ष ठेवून आहे. अनेक कंपन्यांनी किमती कमी करून जीएसटीचा लाभ ग्राहकांना देत असल्याचे सांगितले आहे. मात्र, सोशल मीडियावर अनेक ग्राहकांनी तक्रारी केल्या आहेत की, काही कंपन्या जीएसटी दरांमध्ये कपात होऊनही ग्राहकांना त्याचा लाभ देत नाहीत. त्यामुळे, ग्राहकांनी आता या नवीन क्रमांकांवर तक्रार करून आपला हक्क मांडावा, असे आवाहन करण्यात येत आहे.