नवी दिल्ली : केंद्र सरकारने गुरुवारी घोषित केलेल्या आठव्या वेतन आयोगामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनात घसघशीत वाढ होणार आहे की, केवळ मध्यम स्वरुपाची वाढ होईल, या प्रश्नाची चर्चा सुरू झालेली आहे.
आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेस केंद्र सरकारने मंजुरी दिल्याची माहिती केंद्रीयमंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी दिली. निवृत्ती वेतनात नेमकी कशी वाढ होईल, असा प्रश्न आहे.
आयोगाचे चेअरमन आणि दोन सदस्यांची नियुक्ती केली जाईल. दिले जाणारे वेतन फिटमेंट फॅक्टरच्या आधारे निश्चित होते. केंद्रीय कर्मचारी व निवृत्त कर्मचाऱ्यांना ७व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार वेतन व पेन्शन मिळत आहे.
प्रतीक्षा अखेर संपली मागील दहा वर्षांपासून कर्मचारी ८व्या वेतन आयोगाची वाट पाहत होते. अनेकांना असे वाटत होते की सरकार यापुढे वेतन आयोग मंजूर करणार नाही. यामुळे विद्यमान कर्मचाऱ्यांप्रमाणे निवृत्त कर्माराही चिंतेत होते. या निर्णयामुळे लाखो निवृत्त कर्मचाऱ्यांनाही दिलासा मिळाला.
काय सांगतात जाणकार?टीमलीजचे उपाध्यक्ष कृष्णेंदू चटर्जी म्हणाले की, फिटमेंट फॅक्टर २.५ ते २.८ दरम्यान गृहीत धरल्यास सध्या ९ हजारांची पेन्शन २२,५०० ते २५,२०० रुपये होऊ शकते. सिंघानिया अँड कंपनीचे भागीदार रितिका नय्यर यांनी सांगितले की, आठव्या वेतन आयोगातून पेन्शनमध्ये २० टक्के ते ३० टक्के वाढ मिळू शकते. फॉक्स मंडल अँड असोसिएट्स एलएलपीचे सुमित धर म्हणाले की, आयोगाचा फिटमेंट फॅक्टर २.८६ एवढा मान्य केल्यास वेतन व पेन्शनची किमान वाढ १८६ टक्के असू शकेल. एसकेव्ही लाॅ ऑफीसेसचे वरिष्ठ असोसिएट भारद्वाज म्हणाले की, पेन्शन २५ ते ३० टक्के वाढू शकते.