Join us

सायबर गुन्हेगारांची ही हिंमत! पोलिसांनाच दिल्या शिव्या; पीडितेकडे १० लाखांची मागणी; फोन केला हॅक?

By राहुल पुंडे | Updated: December 10, 2024 14:53 IST

cyber crime : अनोळखी नंबरवरुन आलेला कॉल रिसीव्ह करताना संपूर्ण फोन हॅक झाला. त्यानंतर जे घडलं त्याने तरुणासोबत पोलिसही धास्तावले आहेत.

cyber crime : देशात इंटरनेटचा स्पीड वाढला तशी सायबर गुन्हेगारीही झपाट्याने वाढली. रोज हजारो लोकांची कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक केली जात आहे. धक्कादायक म्हणजे सायबर गुन्ह्यात गमावलेले पैसे परत मिळव्याची शक्यता फक्त १ टक्के सांगितली जाते. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या तक्रारींपुढे सायबर पोलीसही हतबल झाल्याचे दिसत आहेत. न्यूड कॉल, सेक्सटॉर्शन, टास्क फ्रॉड, शेअर मार्केट, फेक कॉल, डिजिटल अरेस्ट अशा असंख्य प्रकारे लोकांना गंडा घातला जात आहे. जनजागृती करावी तरी कशाकशाची अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशात आता नवीन फ्रॉडने तर खळबळ उडाली आहे. एका मिस्डकॉलद्वारे पुण्यातील एका तरुणाचा फोन हॅक केल्याची घटना समोर आली आहे.

कॉलद्वारे फोन केला हॅकसायबर गुन्हेगारांनी स्मार्टफोन हॅक करण्याचे आधुनिक तंत्र विकसित केलं आहे. यासाठी कुठलाही मेल, एसएमएस किंवा एपीके फाईलद्वारे मालवेयर पाठवला जात नाही. तर फक्त मिस्ड कॉल दिला जातो. पीडित तरुणाला सकाळी एका अनोळखी नंबरवरुन एक मिस्ड कॉल आला. नंतर त्या नंबरवरुन सारखा फोन येऊ लागला. उत्सुकतेपोटी फोन रिसीव्ह केला आणि लगेच कट झाला. त्यानंतर तरुण हा प्रकार विसरुन केला. मात्र, दोन तासात त्याला आणखी एका नंबरवरुन फोन करुन २ लाखांची मागणी करण्यात आली. दुपारपर्यंत ही मागणी १० लाख रुपयांपर्यंत पोहचली. या मागणीला नकार दिल्यानंतर त्यांनी फोनचा संपूर्ण एक्सेस ताब्यात घेतला. नातवाईकांना अश्लिल शिवीगाळनातेवाईकांच्या नंबरवर फोन करून अश्लील शिविगाळ करायला लागले. संबंधित व्यक्तीने बँकेचे पैसे थकवलेत. त्यांनी तुमचा नंबर दिला आहे. तुम्ही पूर्ण रक्कम भरणार असल्याचे सांगितले आहे. लवकर रक्कम भरा नाहीतर तुमच्या घरी बँकेचे लोकं पाठवतो. गावात तुमचा तमाशा करतो, अशा धमक्या नातेवाईकांना देण्यात आल्या. यामध्ये अनेक महिलांनाही लक्ष्य करण्यात आलं. तोपर्यंत माझ्या फोनमधून सर्व संपर्क क्रमांक उडवण्यात आले.

सायबर गुन्हेगारांचा फोन ट्रेस करण्याचा प्रयत्न पण..अखेर पीडित तरुणाने पोलिसात धाव घेतली. तक्रार नोंदवत असतानाच पुन्हा गुन्हेगारांचा फोन आला. हे जर थांबावयचं असेल तर १० लाख पाठवा अशी मागणी करण्यात आली. आम्ही सर्व नातेवाईकांना फोन करुन माफी मागतो. तुम्हा १० लाख द्या. पोलिसांनी फोन चालुच ठेऊन त्याच्याशी बोलत रहायला सांगितलं. तोपर्यंत सायबर सिस्टमवर नंबर टाकुन समोरच्या व्यक्तीच्या फोनचं लोकेशन ट्रॅक करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला येरवडा आलं, काही मिनिटांत लगेच नाशिक दाखवायला लागलं. पुन्हा शहरातून पंचवटी दिसायला लागलं.

शेवटी पोलिसांनी फोन घेतला आणि बोलू लागले. तर पोलीस असल्याचे सांगूनही पोलिसांनाच शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. नंतर फोन कट झाला. या सर्व प्रकारात तरुणाने हिंमत दाखवली म्हणून त्याचे आर्थिक नुकसान टळले. मात्र, नातेवाईक आणि तरुणाच्या कुटुंबाला नाहक त्रासाला सामोरे जावे लागले. नागरिकांनी अनोळखी नंबरवरुन येणारे कॉल्स उचलू नये, असे आवाहन पोलिसांनी केलं आहे. 

टॅग्स :सायबर क्राइमस्मार्टफोनमोबाइलगुन्हेगारी