Join us  

1 एप्रिलपासून घर खरेदी, कर्ज घेणे होणार स्वस्त; वाहन अन् घरगुती सिलिंडरच्या किमती भडकणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2019 4:00 PM

नव्या आर्थिक वर्षात नवनव्या आर्थिक बदलांना जनतेला सामोरं जावं लागणार आहे.

नवी दिल्ली- नव्या आर्थिक वर्षात नवनव्या आर्थिक बदलांना जनतेला सामोरं जावं लागणार आहे. अर्थसंकल्पातील तरतुदी आणि जीएसटी समितीनं घेतलेल्या निर्णयांची 1 एप्रिलपासून अंमलबजावणी होणार आहे. घर खरेदी करणं स्वस्त होणार असलं तरी वाहन चालवणं अन् घरगुती सिलिंडर महागणार आहे. प्राप्तिकर विभागानं पॅन कार्डाच्या नियमांत तीन मोठे बदल केले आहेत.1 एप्रिलनंतर तुमच्याजवळ 125 सीसीहून जास्त पॉवरची मोटारसायकल असल्यास त्यात अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम असणं गरजेचं आहे. त्याशिवाय 125 सीसीमध्ये कॉम्बी ब्रेकिंग सिस्टीम असणं गरजेचं आहे. केंद्र सरकारनं 2022 पर्यंतची मुदत दिली असून, पुढील तीन वर्षांत ‘स्मार्ट प्रीपेड मीटर’नेच वीजपुरवठा करणे सक्तीचे होणार आहे.मोबाइलच्या प्रीपेड सिमकार्डसारखेच विजेचे प्रीपेड मीटर असेल. त्यात शिल्लक रक्कम असेपर्यंत वीज वापरता येईल. ती संपताच वीजपुरवठा बंद होईल आणि कार्ड रीचार्ज करताच तो सुरू होईल. मागेल त्याला वीज योजनेखाली वर्षभरात 2.26 कोटी नव्या ग्राहकांना वीजजोडण्या देण्यात आल्या.  1 एप्रिलपासून सर्व ग्राहकांना अविरत वीज पुरविणे कंपन्यांना सक्तीचे होईल.

  • कोणत्या सेवा होणार स्वस्त ?
  • घर खरेदीः जीएसटीच्या बदललेल्या टप्प्यांमुळे घर बांधकामासाठी आवश्यक असलेलं सिमेंट वगळता इतर वस्तूंवर जीएसटी कमी केल्यानं घर खरेदी करणं स्वस्त होणार आहे. 
  • जीवन विमाः विमा कंपन्यांनाही जीएसटीच्या नव्या दराची अंमलबजावणी करावी लागणार आहे. त्यामुळे विमा संरक्षण घेणं काहीसं स्वस्त होणार आहे. 22 ते 50 या वयोगटातील तरुणाईला याचा फायदा होणार आहे. 
  • कर्ज घेणेः कर्जावर आता आरबीआयच्या नियमानुसार रेपो रेट लावला जाणार असल्यानं रेपो रेट घटल्यास व्याजदरात घट होणार आहे. 1 एप्रिलपासून याचा फायदा पोहोचण्याची शक्यता आहे. 
  • बुकिंग रिफंडः 1 एप्रिलपासून रेल्वेचे तिकीट काढल्यानंतर रेल्वे चुकल्यास तिकिटीचे पैसे परत मिळणार आहेत किंवा त्याच तिकिटावरून दुसऱ्या ट्रेननं प्रवास करता येणं शक्यत होणार आहे. 
  • ईपीएफओ ट्रान्सफरः नोकरी बदलल्यास आता कर्मचाऱ्यांना कोणताही अर्ज करावा लागणार नाही. तुमचा ईपीएफओ नवीन कंपनीत थेट ट्रान्सफर करता येणार आहे. 
  • प्राप्तिकर मर्यादाः वार्षिक पाच लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त केल्यामुळे या टप्प्यात येणाऱ्यांना प्राप्तिकर भरावा लागणार नाही.

 

  • कोणत्या सेवा होणार महाग?
  • सीएनजी गॅस: 1 एप्रिलपासून पेट्रोलियम वस्तूंबरोबरच सीएनजी गॅसच्या किमतींमध्ये 18 टक्क्यांची वाढ होणार आहे. त्यामुळे सामान्यांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार आहे. 
  • कार खरेदी- 1 एप्रिलपासून सर्वच वाहनांचे भाग महागणार आहेत. त्यामुळे वाहन निर्मित करणाऱ्या कंपन्या वाहनांच्या किमतीत भरमसाट वाढ करण्याची शक्यता आहे. 
  • घरगुती गॅस- पाइपलाइनद्वारे पुरवठा करण्यात येणार गॅस महाग होण्याची चिन्हे आहेत. घरगुती सिलिंडरचे दरही भडकणार आहेत.  
टॅग्स :घरकार