Join us  

शेअर बाजारात ऐतिहासिक घसरण, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 10:07 AM

मुंबई शेअर बाजारात निर्देशांकात 3090.62 अंकांची आणि 9.43 टक्क्यांची ऐतिहासिक घसरण झाली.

मुंबई - कोरोना व्हायरसचा फटका भारतासह जगभरातील शेअर बाजाराला बसला आहे. आठवड्याच्या चौथ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी भारतीय शेअर बाजारात सुरुवातीलाच मोठी घसरण पाहायला मिळाली. त्यानंतर, शुक्रवारी सकाळीही सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये ऐतिहासिक घसरण झाली. शुक्रवारी सकाळी बाजार खुला झाला, तेव्हा तब्बल 3000 अंकांची घसरण मुंबई शेअर बाजारमध्ये झाल्याचे पाहायला मिळाले. 

मुंबई शेअर बाजारात निर्देशांकात 3090.62 अंकांची आणि 9.43 टक्क्यांची ऐतिहासिक घसरण झाली. निफ्टीमध्येही मोठी घसरण झाल्याने एक तास बाजार बंद करण्यात आला होता. निफ्टीमध्ये 10.07 टक्क्यांनी घसरण होऊन 966.10 अंकांनी निर्देशांकात घट झाली आहे. त्यामुळे, निफ्टी 8624.05 वर येऊन पोहोचला आहे. मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजारातील ही सर्वात मोठी घसरण मानली जात आहे. त्यामुळे, याचा फटका गुंतवणूकदारांना बसला असून तब्बल 11 लाख कोटी रुपये बुडाल्याची माहिती आहे. गुरुवारी दुपारी 2.40 वाजता सेन्सेक्समध्ये 3100 अंकांची घट होऊन 32,600 वर बंद झाला होता. तर निफ्टीत 950 अंकांनी घसरण झाली असून 9,500 अंकांवर स्थिरावला होता. 

दरम्यान, दिवसाच्या गुरुवारी सुरुवातीला 1600 अंकांएवढी मोठी घसरण झाल्याने सेन्सेक्स 34000 अंकावर पोहोचला होता. निफ्टीतही 500 अंकांची घसरण होऊन तो 10 हजारांच्या खाली पोहोचला होता. भारतीय शेअर बाजाराप्रमाणेच अमेरिकेतही शेअर बाजार कोसळला आहे. अमेरिका शेअर बाजारात निर्देशांक 1400 अंकांनी कोसळल्याचे पाहायला मिळाले. अमेरिकेसह प्रमुख देशांच्या शेअर बाजारातही मोठी घसरण पाहायला मिळाली. Dow jones मध्ये 1464.94 अंकांची अर्थात 5.86 टक्के घसरण झाली असून 23,553 वर स्थिरावला आहे. तर एस अँड पीमध्ये 140.85 अंकांची अर्थात 4.89 टक्क्यांची घसरण झाली असून 2741 अंकांवर स्थिरावला. Nasdaq ur 392 अंक घसरला असून 7952 वर स्थिरावला आहे.

टॅग्स :निर्देशांकमुंबईशेअर बाजारशेअर बाजार